National Sports Day: माझा ऑलिम्पिक प्रवास..! नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीतून पॅरिसच्या पदकापर्यंत
National Sports Day: २०१६ आणि २०२० च्या ऑलिम्पिकमधील अपयशानंतरही हार न मानणाऱ्या स्वप्निल कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकले ऐतिहासिक पदक.

National Sports Day: रायफल हातात घेतली आणि नेम धरायला सुरुवात केली, तेव्हा एक दिवस या खेळातून ऑलिम्पिक पदक मिळेल, याची कल्पनाही केली नव्हती. मात्र, नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीत सुरू झालेला माझा प्रवास पुढे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत पोहोचला आणि अखेर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकापर्यंत घेऊन गेला. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून नाशिक येथे माझ्या रायफल नेमबाजीची सुरुवात झाली.
मोठमोठ्या खेळाडूंना पाहून या खेळाविषयीची माझी आवड वाढत गेली. शिक्षण सुरू होते; मात्र खेळाची सुरुवात झाल्यामुळे त्याच्याशी एक वेगळे नाते निर्माण झाले. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे स्कोअर, रँक पाहून आपणही त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, अशी जिद्द निर्माण झाली. त्यातूनच सराव आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू राहिला.
दोन ऑलिम्पिक हुकले, पण प्रयत्न थांबवले नाहीत
2016 मध्ये ऑलिम्पिकसाठी प्रयत्न केला, मात्र निवड झाली नाही. 2020 मध्येही प्रयत्न केले; पण पुन्हा अपयश आले. वाईट वाटले, मात्र खेळ सोडण्याचा विचार केला नाही. त्याच काळात कोविडचे संकट आले. सरावासाठी सुविधा उपलब्ध नव्हत्या. माझी रायफल पुण्यात आणि मी कोल्हापूरच्या घरी अडकलो होतो. सराव करता येत नसल्याने तो काळ कठीण होता. कोविडनंतर पुणे आणि दिल्ली येथे सरावाचे कॅम्प सुरू झाले. खेळाडूंची संख्या कमी असल्यामुळे प्रशिक्षकांचे अधिक लक्ष मिळाले आणि त्याचा तयारीला मोठा फायदा झाला.
चौथ्या स्थानाची खंत आणि ऑलिम्पिक कोटा
2022 मध्ये आयएसएसएफ विश्वअजिंक्यपद स्पर्धेत ऑलिम्पिक कोट्यासाठी सहभागी झालो. पदक मिळाले नाही आणि चौथ्या स्थानावर राहिलो. पदक हुकल्याची खंत होती. मात्र, त्यानंतर प्रशिक्षकांनी ऑलिम्पिक कोटा मिळाल्याची बातमी दिली आणि प्रवासाला वेगळे वळण मिळाले. कोटा टिकवण्यासाठी दिल्ली आणि भोपाळ येथे निवड चाचण्या झाल्या. भोपाळमध्ये काही राऊंडमध्ये कमी पडलो; पण त्यातून सावरत चांगली कामगिरी केली. अखेर भारतीय संघात माझी निवड झाली आणि ऑलिम्पिकचा खरा प्रवास सुरू झाला.
प्रत्येक शॉटमध्ये संयमाची परीक्षा
50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये प्रोन, नीलिंग आणि स्टँडिंग अशा तीन पोझिशन्स असतात. त्यातील नीलिंग पोझिशन विशेष आव्हानात्मक आहे. 16 शॉट्सचा हा राऊंड सुमारे एक तास 30 मिनिटांत पूर्ण करावा लागतो. त्यामुळे शारीरिक क्षमतेसोबत मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि संयमही तितकाच महत्त्वाचा असतो. ऑलिम्पिकपर्यंतच्या प्रवासात प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. माझ्या यशामागे आई-वडील, भाऊ, बहीण, प्रायोजक, फिजिओथेरपिस्ट सुमित्रा जैन, न्यूट्रिशनिस्ट, वैभव सर आणि राष्ट्रीय फेडरेशन यांचेही मोठे योगदान आहे.
प्रत्येकाने एक खेळ जोपासावा
राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त मी प्रत्येकाला सांगू इच्छितो की, तुम्ही विद्यार्थी असाल किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, आपल्या आवडीचा एक खेळ निवडा आणि तो जोपासा. खेळामुळे शारीरिक आरोग्य चांगले राहते, कार्यक्षमता सुधारते आणि व्यक्तिमत्त्व घडते. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळालाही तितकेच महत्त्व द्यावे. देशाला अधिकाधिक ऑलिम्पिक पदकविजेते घडवायचे असतील,
तर खेळाडूंना केवळ आर्थिक मदत नव्हे, तर आवश्यक साहित्य, उत्तम प्रशिक्षण, न्यूट्रिशन, फिजिओथेरपी आणि मानसिक आरोग्याच्या सुविधाही मिळणे गरजेचे आहे. माझी सर्व क्रीडाप्रेमींना विनंती आहे, की आपल्या आवडीचा खेळ निवडा, मनापासून जोपासा आणि सातत्य ठेवा. खेळ तुमचे आरोग्य तर चांगले ठेवेलच, पण आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलेल. राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त दैनिक ‘प्रभात’च्या क्रीडा पुरवणीला आणि सर्व क्रीडाप्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा.
– स्वप्निल कुसाळे
पॅरिस ऑलिम्पिक पदकविजेता नेमबाज






