National Sports Day: विशेष संपादकीय: राष्ट्रीय खेळात गतवैभव लाभावे
National Sports Day: मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा; पण क्रिकेटच्या प्रभावाखाली राष्ट्रीय खेळ हॉकी उपेक्षित राहिल्याची खंत.

National Sports Day: भारताचा राष्ट्रीय खेळ खरे तर हॉकी. परंतु, इंग्रजांनी जन्माला घातलेल्या बाळाचे संगोपन आपण केल्याप्रमाणे आपल्याकडे क्रिकेट फोफावले. आजच्या पिढीला आपला राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, हेदेखील माहिती असेल का, अशी शंका येते. त्याला कारणही तसेच आहे. या खेळात आपल्या जादूई कामगिरीने अजरामर ठरलेल्या हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन आपण राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा करतो.
मात्र, ध्यानचंद यांची कामगिरी व भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ किती लोकांना ठाऊक आहे, हाच खरा प्रश्न आहे. क्रिकेटपटूंची कामगिरी व आकडेवारी तर जवळपास प्रत्येकाला तोंडपाठ असते. शाळेत शिकवलेले पाढे आपले पाठ नसतात, परंतु सचिन तेंडुलकरने किंवा विराट कोहलीने किती धावा केल्या, शतके किती ठोकली, हे लक्षात असते. भारतीय हॉकीने एकेकाळी जगावर राज्य केले,
मात्र आज त्याच खेळात आपण अन्य देशांपुढे नमते घेताना दिसतो हे अपयश कोणाचे? भारतीय हॉकी महासंघ, त्यावर असलेले अध्यक्ष व अन्य पदाधिकारी, प्रशिक्षक, प्रशिक्षण अकादमी व तेथील सपोर्ट स्टाफ यांनी मनापासून या खेळाच्या प्रगतीसाठी काहीही केलेले नाही, हीच वस्तुस्थिती आहे. कारण जिथे-जिथे करणे शक्य आहे तिथे आपण फक्त आणि फक्त राजकारणच करत आलो आहोत.
ध्यानचंद यांचा वारसा समर्थपणे चालवणारा धनराज पिल्ले आधुनिक हॉकीचा जादूगार होता. मात्र, पंजाबचे तत्कालीन पोलीस महासंचालक केपीएस गिल व धनराज यांच्यात धुसफूस झाली आणि 1980 च्या दशकानंतर भारतीय हॉकीची पीछेहाट सुरू झाली, ती आजतागायत सुरू आहे. आजच्या संघात कर्णधार हरमनप्रीत सिंग किंवा महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल सरस कामगिरी करीत आहेत. परंतु आपल्याला चांगले नव्हे, तर महान खेळाडू हवे आहेत, जे भारतीय हॉकीला गतवैभव प्राप्त करून देतील.
इंग्रजांच्या अमलात भारतात आलेल्या या खेळाने मुळे धरली. 7 नोव्हेंबर 1925 रोजी इंडियन हॉकी फेडरेशनची स्थापना झाली. त्यानंतर 1928 च्या अॅमस्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिले ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. तेव्हापासून ते 1956 या काळात ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने सलग सुवर्णपदकांवर सातत्याने आपले वर्चस्व राखले. लॉस एंजेलिस 1932, बर्लिन 1936 ऑलिम्पिकमध्येही भारताने सुवर्णपदक पटकावले.
स्वातंत्र्योत्तर काळात 1948, 1952 आणि 1956 च्या ऑलिम्पिकमध्येही भारताची सुवर्णविजयाची परंपरा कायम राहिली. टोकिओ 1964 आणि मॉस्को 1980 ऑलिम्पिकमध्ये भारताने पुन्हा सुवर्णपदके जिंकली. भारताने 1975 मध्ये क्वालालंपूर येथे झालेली हॉकी विश्वचषक स्पर्धा जिंकून इतिहास रचला होता. हे विजेतेपद भारतीय पुरुष हॉकीचे एक मोठे यश मानले जाते. ध्यानचंद यांच्यानंतर धनराजसह सरदार सिंग, मनप्रीत सिंग आणि महिला संघातून राणी रामपाल यांसारख्या खेळाडूंनी भारतीय हॉकीला पुढे नेले.
खरे तर जागतिक हॉकीमध्ये भारत आणि पाकिस्तानचे पहिल्यापासूनच वर्चस्व होते, त्यांनी अनुक्रमे आठ ऑलिम्पिक सुवर्ण आणि पहिल्या पाचपैकी तीन विश्वचषक जिंकले. त्यानंतर बेल्जियम, नेदरलँड्स, जर्मनी, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि स्पेन यांच्या वर्चस्वामुळे भारताची या खेळातील मक्तेदारी संपुष्टात आली. 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात गवत खेळण्याच्या पृष्ठभागाची जागा कृत्रिम टर्फने बदलली गेली. पुरुष गटात अर्जेंटिना, इंग्लंड आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश होतो. त्यांनी भारताचा दबदबा कमी केला. नेदरलँड, ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना हे महिलांमध्ये सर्वाधिक यशस्वी संघ ठरले आहेत.
ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये फील्ड हॉकीचा समावेश करण्यापूर्वी नेदरलँड हा महिलांचा प्रमुख संघ होता. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया हा महिलांचा सर्वात मजबूत संघ म्हणून उदयास आला होता. अर्जेंटिनाने 2000 च्या दशकात आपल्या खेळात सुधारणा केली. 2003, 2010 आणि 2013 मध्ये आयएफएच क्रमवारीत अग्रस्थान मिळवले. जर्मनी, ग्रेट ब्रिटन, चीन, दक्षिण कोरिया आणि भारत हे इतर प्रमुख महिला संघ आहेत. भारतात आजच्या घडीला हॉकीचा पारंपरिक चाहताच दिसत नाही.
जेव्हा मोठी स्पर्धा असते त्याचा अपवाद वगळता देशांतर्गत स्पर्धांमध्ये प्रो-हॉकी लीगलाही फारसा प्रेक्षकवर्ग लाभताना दिसत नाही. उलट आयपीएलकडे तुफान पैसा व लोकप्रियता टिकून आहे. कदाचित आपल्या देशात इंग्रजांनी सुरु केलेली कोणतीही गोष्ट आपण बंद करू शकलो नाही, हे एक त्यामागचे कारण असावे. या खेळाला कोणीही खेळाडू ब्रँड म्हणून लाभला नाही. क्रिकेटला सचिन पावला; मात्र धनराजबाबत राजकारण करण्यात आले व हॉकीच्या सचिनला आपण मुकलो.
या खेळाला थोडेफार स्टारडम देण्यासाठी काही धाडसी चित्रपट दिग्दर्शकांनी शाहरूख खानला घेऊन चक दे इंडिया किंवा अक्षयकुमार घेऊन गोल्ड असे चित्रपट निर्माण केले. मात्र, त्यातून या कलाकारांचाच जास्त लाभ झाला. खेळाला प्रत्यक्ष फायदा काहीही झाला नाही. क्रिकेटला सचिन, टेनिसला लियांडर पेस व महेश भूपती तसेच सानिया मिर्झा, बॅडमिंटनला प्रकाश पदुकोण, सायना नेहवाल व पीव्ही सिंधू, बुद्धिबळात ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद, अभिजित कुंटे, आर. प्रज्ञानंद असे खेळाडू लाभले व खेळाची ब्रँड व्हॅल्यू वाढली.
त्यांना लोकाश्रयाबरोबरच राजाश्रयही लाभला तो हॉकीला लाभताना दिसत नाही. आज आपण राष्ट्रीय क्रीडादिन साजरा करत आहोत; मात्र ज्या खेळामुळे जगात देशाची मान उंचावली त्याच खेळाची धूसर होत चाललेली ओळख तरी कायम राहील का? अशी आता भीती वाटू लागली आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2024 मध्ये स्पेनला 2-1 असे पराभूत करत भारतीय संघाने कांस्यपदकाची कमाई केली होती, त्यानंतर मात्र आपली पाटी कोरीच राहिली आहे.
अनेकदा तर हॉकी आपला राष्ट्रीय खेळ असूनही आपले संघ चक्क ऑलिम्पिकला पात्रही ठरू शकलेले नाहीत. ही स्थिती बदलण्यासाठी केवळ हॉकी महासंघाने किंवा खेळाडूंनी प्रयत्न करून चालणार नाहीत, तर प्रायोजकांना आकर्षित करत स्पर्धांची व्याप्ती वाढवून कोचिंग सेंटर ऑफ एक्सलन्ससारख्या सुविधाही अस्तित्वात आल्या पाहिजेत, तरच आपण गतवैभवाची अपेक्षा करू शकतो.






