National Sports Day : स्वतःच्या अनुभवातून पुढची इनिंग घडवताना
क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूची ओळख त्याने केलेल्या धावा, घेतलेले बळी किंवा गाजवलेल्या सामन्यांमधून तयार होते. पण काही प्रवास असे असतात, ज्यांची खरी गोष्ट मैदानावरील कारकीर्द संपल्यानंतर सुरू होते.

National Sports Day : क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूची ओळख त्याने केलेल्या धावा, घेतलेले बळी किंवा गाजवलेल्या सामन्यांमधून तयार होते. पण काही प्रवास असे असतात, ज्यांची खरी गोष्ट मैदानावरील कारकीर्द संपल्यानंतर सुरू होते. स्वतःसाठी खेळताना जे काही शिकले, अनुभवले, गमावले आणि मिळवले, ते पुढच्या पिढीतील खेळाडूंना देण्याची वेळ आली की त्या प्रवासाला वेगळेच महत्त्व प्राप्त होते. श्रीकांत श्रीहरी मुंढे यांची क्रिकेटमधील सध्याची इनिंग अशीच आहे.
एकेकाळी महाराष्ट्राच्या रणजी संघासाठी बॅट आणि बॉल दोन्हीने योगदान देणारे श्रीकांत मुंढे आज त्याच खेळाकडे दुसर्या नजरेने पाहात आहेत. खेळाडू म्हणून दबाव अनुभवला, मोठ्या सामन्यांत खेळले, आयपीएलच्या ड्रेसिंगरूमचा भाग झाले, भारताच्या युवा संघांमध्ये खेळले आणि इंग्लंडमधील क्लब क्रिकेटमधून वेगळ्या क्रिकेट संस्कृतीचा अनुभव घेतला.
या सगळ्या अनुभवांची शिदोरी आता ते प्रशिक्षक म्हणून वापरत आहेत. 27 ऑक्टोबर 1988 रोजी जन्मलेले मुंढे उजव्या हाताचे फलंदाज आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारे अष्टपैलू. त्यांच्या गोलंदाजीचा वेग ताशी 130 ते 140 किलोमीटरपर्यंत पोहोचत असे. महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये त्यांनी स्वतःची जागा निर्माण केली आणि त्याच काळात पुणे वॉरियर्स इंडिया व कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल संघांचे प्रतिनिधित्व करण्याची संधीही मिळवली. मात्र त्यांच्या कारकिर्दीचा
केंद्रबिंदू ठरला तो रणजी करंडक…!!
महाराष्ट्र प्रीमियर लीगमधील ‘पुणेरी बाप्पा’ संघासोबत फास्ट बॉलिंग कोच म्हणून काम करतानाही त्यांनी व्यावसायिक क्रिकेटपटूंच्या जवळून काम केले. बॉलिंग स्ट्रॅटेजीपासून टॅक्टिकल प्लॅनिंगपर्यंत आणि मॅच प्रिपरेशन-पासून कामगिरीच्या विश्लेषणापर्यंत त्यांनी आपला अनुभव वापरला. खेळाडू म्हणून दबावाखाली खेळल्याचा अनुभव असल्यामुळे आज एखादा युवा क्रिकेटपटू कोणत्या मानसिक अवस्थेतून जात असेल, याची त्यांना कल्पना असते. भारतातील आणि इंग्लंडमधील क्रिकेटमधील फरक अनुभवला असल्याने खेळाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही व्यापक झाला आहे. त्यामुळे प्रशिक्षक म्हणून त्यांचा भर केवळ चुका दाखवण्यावर नाही. खेळाडूची ताकद ओळखून त्याला अधिक चांगले बनविण्यावर आहे.
रणजीच्या मैदानावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू, आयपीएलच्या प्रकाशझोतात पोहोचलेला अष्टपैलू, इंग्लंडच्या क्लब क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करणारा क्रिकेटपटू आणि आता नव्या पिढीला घडविणारा ‘प्रशिक्षक श्रीकांत मुंढे’ यांचा प्रवास एका इनिंगपासून दुसर्या इनिंगपर्यंत पोहोचला आहे. पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी स्वतःच्या नावासाठी धावा आणि बळी मिळवले. दुसर्या इनिंगमध्ये मात्र धावा-बळी त्यांच्या नावावर जमा होणार नाहीत. नुकतीच जीतो अॅपेक्सच्या वतीने क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून जेपीएल स्पर्धेचा पहिला हंगाम 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान श्रीलंकेतील कोलंबो येथे आयोजित केला आहे. या स्पर्धेत पुणे पेशवाज संघ पुण्याचे प्रतिनिधित्व करेल.
त्यामध्ये श्रीकांत मुंढे हे टीम चे कोच आहेत. क्रिकेटच्या या महत्त्वपूर्ण स्पर्धेत धावा आणि बळी मिळवले जातील ते जमा होतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडणार्या खेळाडूंच्या नावावर आणि म्हणूनच मुंढे यांची ही दुसरी इनिंग कदाचित पहिल्यापेक्षाही अधिक मोठी ठरू शकते…. कारण, आता त्यांचे लक्ष्य स्वतःची कारकीर्द घडवणे नाही, तर दुसर्यांची कारकीर्द घडवणे आहे.
महाराष्ट्राच्या यशात महत्त्वाची भूमिका
2013, 2014 आणि 2015 अशी सलग तीन वर्षे ‘प्लेअर ऑफ द इयर’ म्हणजेच मालिकावीर पुरस्कार मिळवणे, ही त्यांच्या सातत्याची पावती होती. 2014-15 च्या रणजी हंगामात ते स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू ठरले. महाराष्ट्राचा संघ तब्बल 25 वर्षांनंतर रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत पोहोचला, त्या ऐतिहासिक वाटचालीत मुंढे यांचे योगदान महत्त्वाचे होते. त्यांच्या खेळात एक वेगळी गोष्ट होती, ती म्हणजे परिस्थितीनुसार भूमिका बदलण्याची क्षमता.
गरज असेल तेव्हा फलंदाज म्हणून डाव सावरणे आणि संघाला बळींची गरज असताना चेंडू हातात घेणे, हे त्यांना चांगले जमले. 2014 मध्ये बडोद्याविरुद्धच्या लिस्ट-ए सामन्यात सलग चार चेंडूंवर चार बळी घेण्याचा विक्रम त्यांच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षणांपैकी एक. गुजरातविरुद्धच्या पदार्पणाच्या लिस्ट-ए सामन्यात 5 बाद 18 अशी प्रभावी गोलंदाजी करत त्यांनी आपल्या क्षमतेची झलक दिली. महाराष्ट्रासाठी सलग तीन रणजी हंगामांत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणूनही त्यांनी आपली छाप सोडली. पण मुंढे यांची क्रिकेटची दुनिया महाराष्ट्रापुरती थांबली नाही.
इंग्लंडच्या क्रिकेटने दिली नवी दृष्टी
भारतीय क्रिकेटमध्ये खेळताना मिळालेला अनुभव एका बाजूला आणि इंग्लंडमधील क्लब क्रिकेटने दिलेला अनुभव दुसर्या बाजूला. कॉकरमाउथ, कोल्विन बे, हार्बोर्न, नेदरफिल्ड आणि रीड क्रिकेट क्लब अशा विविध संघांसाठी खेळताना मुंढे यांनी इंग्लिश क्रिकेटचा वेगळा दृष्टिकोन जवळून अनुभवला. 2016 मध्ये कोल्विन बे संघाकडून लिव्हरपूल प्रीमियर लीगमध्ये दहा बळी घेण्याची कामगिरी त्यांनी केली. त्यानंतर 2018 मध्ये हार्बोर्न क्रिकेट क्लबकडून हजार धावांचा टप्पा गाठताना नाबाद 187 धावांची सर्वोच्च खेळी केली आणि त्याच हंगामात 43 बळीही मिळवले.
म्हणजेच बॅट आणि बॉल यांच्यातील समतोल त्यांच्या खेळाचा कायमच भाग राहिला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 185 बळी, 6 बाद 38 ही सर्वोत्तम गोलंदाजी, तर फलंदाज म्हणून 207 धावांची सर्वोच्च खेळी, सात शतके आणि 12 अर्धशतके अशी त्यांची कामगिरी आहे. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 69 सामन्यांत 95 बळी आणि 102 धावांची सर्वोच्च खेळी त्यांच्या नावावर आहे. पण या आकड्यांमागे एक क्रिकेटपटू म्हणून शिकलेले अनेक धडे दडले आहेत.
अनुभवाची शिदोरी आता खेळाडूंसाठी
खेळाडू म्हणून मिळवलेली प्रत्येक गोष्ट पुढे कधीतरी कामी येते, हे मुंढे यांच्या सध्याच्या भूमिकेतून जाणवते. क्रिकेटमध्ये केवळ नैसर्गिक गुणवत्ता पुरेशी नसते. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे, शरीराची काळजी घेणे, सरावाचे नियोजन करणे, सामन्याच्या परिस्थितीचा अंदाज घेणे आणि मानसिकदृष्ट्या तयार राहणे तितकेच महत्त्वाचे असते. याच विचारातून त्यांनी कोचिंगकडे वळताना स्वतःची तयारीही केली. बीसीसीआयचा हायब्रिड लेव्हल-2 अभ्यासक्रम त्यांनी ‘डिस्टिंक्शन’सह पूर्ण केला. त्याचबरोबर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाचे लेव्हल-2 कोचिंग प्रमाणपत्रही मिळवले.
सध्या केदार जाधव क्रिकेट अकादमीमध्ये हाय परफॉर्मन्स बॅचचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून ते काम पाहात आहेत. येथे त्यांचे काम केवळ तंत्र शिकविण्यापुरते मर्यादित नाही. एखाद्या फलंदाजाचा खेळ अधिक प्रभावी कसा होईल, वेगवान गोलंदाजाने आपला वर्कलोड कसा सांभाळावा किंवा अष्टपैलू खेळाडूने दोन्ही कौशल्यांमध्ये योग्य संतुलन कसे साधावे, यावर ते काम करतात. सामन्याची तयारी, परफॉर्मन्स प्लॅनिंग, व्हिडिओ विश्लेषण, कौशल्य विकास आणि वर्कलोड मॅनेजमेंट या आधुनिक क्रिकेटमधील महत्त्वाच्या बाबी त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग आहेत.





