National Sports Day: ग्लासगोचा धडा, अहमदाबादचे स्वप्न…!
National Sports Day: १९३४ च्या लंडन राष्ट्रकुलपासून २०26 च्या ग्लासगो स्पर्धेपर्यंत; भारतीय खेळाडूंची जागतिक क्रीडा विश्वातील ऐतिहासिक वाटचाल.

National Sports Day: दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी ‘हॉकीचे जादूगार’ मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा ‘राष्ट्रीय क्रीडादिन’ हा केवळ उत्सवाचा किंवा औपचारिक सत्कार समारंभांचा दिवस उरलेला नाही. जागतिक क्रीडा नकाशावर भारताने गेल्या काही वर्षांत घेतलेली उत्तुंग भरारी, पारंपरिक न्यूनगंडावर केलेली मात आणि थेट ऑलिम्पिक महासत्तांच्या पंक्तीत बसण्यासाठी सुरू असलेली धडपड यांचे वास्तववादी मूल्यमापन करण्याची ही योग्य वेळ आहे.
ऑलिम्पिकनंतर भारतासाठी सर्वाधिक प्रतिष्ठेची आणि आत्मविश्वासाची चाचणी ठरलेली स्पर्धा म्हणजे ‘राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा.’ राष्ट्रकुलमधील ऐतिहासिक यशाच्या भक्कम पायावर उभी राहिलेली ही क्रीडा संस्कृती आता 2026 च्या आव्हानात्मक अनुभवातून तावून-सुलाखून निघत, 2030 चे यजमानपद व 2036 च्या ऑलिम्पिक स्वप्नाच्या महत्त्वाकांक्षेपर्यंत येऊन पोहोचली आहे.
राष्ट्रकुलचा ऐतिहासिक वारसा आणि 2010 चा सुवर्णकाळ
भारताचा राष्ट्रकुल स्पर्धांमधील प्रवास 1934 च्या लंडन स्पर्धेत सुरू झाला, जिथे कुस्तीगीर राशीद अन्वर यांनी कांस्यपदक पटकावून देशाचे खाते उघडले होते. स्वातंत्र्यानंतर 1958 मध्ये वेल्समधील कार्डिफ येथे ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांनी 440 यार्ड शर्यतीत जिंकलेले ऐतिहासिक सुवर्णपदक आणि त्याच स्पर्धेत कुस्तीगीर लीला राम यांनी मिळवलेले सुवर्ण हे स्वतंत्र भारताच्या क्रीडा आत्मभानाचे पहिले मोठे प्रकटीकरण होते.
या प्रवासातील सर्वात देदीप्यमान क्षण 2010 च्या नवी दिल्ली राष्ट्रकुल आयोजनात पाहायला मिळाला. घरच्या मैदानावर, अनुकूल हवामानात आणि लाखो क्रीडाप्रेमींच्या प्रचंड पाठिंब्याच्या जोरावर भारतीय खेळाडूंनी 38 सुवर्ण, 27 रौप्य आणि 36 कांस्य अशी विक्रमी 101 पदकांची ऐतिहासिक कमाई केली. पदकतालिकेत बलाढ्य इंग्लंड आणि कॅनडाला मागे टाकत भारताने पटकावलेले दुसरे स्थान हे देशाच्या क्रीडा इतिहासातील सुवर्णशिखर ठरले.
2026 ची कसोटी ‘मर्यादित खेळां’मध्येही भारतीय गुणवत्तेची चमक
2026 ची ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धा ही भारतासाठी क्रीडा इतिहासातील सर्वात मोठी प्रशासकीय आणि तांत्रिक परीक्षा ठरली. आयोजकांनी खर्चात कपात करण्यासाठी खेळांची संख्या केवळ 10 प्रमुख क्रीडाप्रकारांपुरती मर्यादित ठेवली. यात कुस्ती, नेमबाजी, बॅडमिंटन, हॉकी, क्रिकेट, टेबल टेनिस आणि तिरंदाजी या भारताच्या हक्काच्या पदकांची लयलूट करणार्या पारंपरिक खेळांना थेट वगळण्यात आले होते.
क्रीडाविश्वात अशी भीती व्यक्त केली जात होती की, या खेळांअभावी भारताची पदकांची पाटी कोरी राहील. मात्र, भारतीय खेळाडूंनी या प्रतिकूल परिस्थितीचे रूपांतर सुवर्णसंधीत केले. उपलब्ध मोजक्या खेळांमध्ये-विशेषतः अॅतथलेटिक्स, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग व पॅरा-स्पोर्ट्समध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली.
अॅनथलेटिक्समधील स्प्रिंट, रिले आणि फिल्ड प्रकारांत मिळवलेली चिवट पदके, वेटलिफ्टिंगमधील भारोत्तोलकांचा निर्विवाद दबदबा आणि बॉक्सिंगमधील आक्रमक विजयांच्या जोरावर भारताने सिद्ध केले की, भारतीय क्रीडापटू आता केवळ 2-3 खेळांवर अवलंबून नसून कोणत्याही जागतिक खेळात ताकदीने उभे राहू शकतात. 2026 ची ही मर्यादित स्पर्धा भारताची ‘मानसिक कणखरता’ आणि ‘पर्यायी खेळांमधील खोली’ अधोरेखित करणारी ठरली.
क्रीडा संस्कृतीचे नवे पर्व
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील भारताची वाटचाल ही केवळ जिंकलेल्या पदकांची गोळाबेरीज नसून ती देशातील क्रीडा संस्कृतीच्या परिपक्वतेचे प्रतीक आहे. 2026 च्या मर्यादित खेळांमधील आव्हानांवर मात करून भारताने दाखवलेली ताकद हे सिद्ध करते की, भारतीय क्रीडा क्षेत्राचा पाया आता भक्कम झाला आहे. 2030 च्या संभाव्य घरच्या मैदानावरील राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सर्व खेळांच्या पुनरागमनासह शतकी पदकांची नवी वेस ओलांडणे आणि तिथून थेट 2036 च्या ऑलिम्पिकमध्ये जगातील अव्वल 10 देशांमध्ये स्थान मिळवणे हे आता केवळ स्वप्न नसून एक साध्य उद्दिष्ट आहे.
जेव्हा देशातील प्रत्येक शाळेच्या मैदानावर खेळाचा तास अनिवार्य होईल, ग्रामीण भागातील मातीच्या आखाड्यातील मल्लाला व ट्रॅकवर धावणार्या् आदिवासी मुलाला वेळेत आधुनिक क्रीडाविज्ञान, सकस आहार व योग्य मार्गदर्शन लाभेल, तेव्हाच भारताची ही क्रीडाक्रांती पूर्णत्वास जाईल. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी हाच संकल्प करणे ही त्यांना खरी आदरांजली ठरेल.
वर्तमानातील आधारस्तंभ; तंत्र, मानसिकता-देहबोलीतील बदल
आजच्या भारतीय क्रीडाविश्वाचे नेतृत्व अशा पिढीकडे आहे, ज्यांनी पराभवाची मानसिकता कायमची मोडून काढत जागतिक स्तरावर सातत्यपूर्ण विजयाची सवय लावली आहे. भालाफेकमध्ये नीरज चोप्राने पेरलेला बायोमेकॅनिकल अचूकतेचा मंत्र असो, दुखापतींमधून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुनरागमन करण्याची जिद्द असो वा मोठ्या स्पर्धांच्या पहिल्याच प्रयत्नात प्रतिस्पर्ध्यावर मानसिक दबाव टाकण्याचे कौशल्य; नीरज आधुनिक भारतीय क्रीडेचा दीपस्तंभ बनला आहे.
नेमबाजीत मनू भाकरने प्रतिकूल तांत्रिक धक्क्यांमधून सावरून दाखवलेली मानसिक शांतता आणि श्वासावरील नियंत्रण हे नव्या भारताच्या एकाग्रतेचे प्रतीक आहे. बॅडमिंटन कोर्टवर सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने पारंपरिक बचावात्मक शैली मोडीत काढून अति-आक्रमक, वेगवान स्मॅशेसच्या जोरावर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. तिकडे लक्ष्य सेनचा चिवट डिफेन्स व प्रतिस्पर्ध्याला शारीरिकदृष्ट्या थकवण्याची क्षमता अजोड ठरत आहे, तर अमन सेहरावत आणि अंतिम पांघल यांच्यासारखे युवा मल्ल पारंपरिक मातीच्या आखाड्यांचे संस्कार आणि आधुनिक मॅटवरील चपळ हालचाली यांचा सुरेख संगम घडवत आहेत.






