National Sports Day: अहिल्यानगरच्या शिलेदारांचा भारतीय क्रिकेटमध्ये ‘डंका’!
National Sports Day: स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या दूरदृष्टीतून रोवलेले रोपटे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली बनले वटवृक्ष; अहिल्यानगर असोसिएशनचे क्रिकेट विकासात मोठे योगदान.

National Sports Day: हिरवेगार मैदान, लाल मातीचा सुगंध आणि हातात बॅट-बॉल धरून देशाचे स्वप्न पाहणारे हजारो डोळे! अहिल्यानगरच्या गल्लीबोळांत आणि 14 तालुक्यांमधील विविध अकादमींमध्ये सध्या एका नव्या क्रिकेट क्रांतीचा जन्म होत आहे. माजी आमदार स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या दूरदृष्टीने लावलेले हे रोपटे आज आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली वटवृक्ष झाले आहे.
नगरची क्रिकेटमधील गुणवत्ता आता थेट रणजी, आयपीएल आणि भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आपल्या खेळाचा डंका वाजवणार्याे अहिल्यानगरच्या या क्रिकेटपटूंची आणि त्यांच्या ध्येयवेड्या प्रवासाची ही रंजक कथा. अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (एडीसीए) माध्यमातून जिल्ह्यातील क्रिकेट परंपरेला आज एक नवी, अत्यंत गतीमान आणि आशादायक दिशा मिळाली आहे. स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या दूरदृष्टीतून आणि मार्गदर्शनातून जिल्ह्यातील क्रिकेट एक नवा आयाम प्रस्थापित करत आहे.
जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अरुणकाकांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर प्रिमियर लीग सलग तीन वर्ष घेण्यात आली. अध्यक्षीय चषक, आमदार चषक, क्रॉम्पटन क्रिकेट स्पर्धा 33 वर्षे अविरतपणे सुरू होती. अरुणकाकांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेब पवार शालेय करंडक स्पर्धाही घेण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांच्या कुशल आणि प्रगतशील नेतृत्वाखाली क्रिकेटची ही परंपरा आता यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर प्रीमियर लीग, महिला प्रीमियर लीग, तसेच 14 आणि 16 वर्षांखालील मुलांच्या प्रीमियर लीग स्पर्धा घेण्यात येत आहेत. यामुळे स्थानिक गुणवत्तेला राज्याच्या आणि देशाच्या नकाशावर आणण्याचे मोलाचे कार्य घडत आहे. आज नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये क्रिकेटचे जाळे पसरले असून ग्रामीण भागासह शहरी भागातही क्रिकेट अकादमी आहेत. या अकादमींच्या माध्यमातून जिल्हाभरात शेकडो नवोदित खेळाडू दररोज मैदानात घाम गाळत आहेत.
या भक्कम पायाभूत सुविधांमुळेच आज नगरच्या क्रिकेट जगतात केवळ मुलांचाच नव्हे, तर मुलींचाही मोठा दबदबा पहायला मिळत आहे. जिल्हा क्रीडा संकूल अर्थात वाडिया पार्क येथे आता क्रिकेटसाठी लॉन असलेले मैदान उभारले जात आहे. तसेच तीन टर्फ विकेटचीही उभारणी सुरू आहे. त्याचा फायदा येथील स्थानिक खेळाडूंना होणार आहे. तसेच येथे राज्य, राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामने घेता येणे शक्य होणार आहे.
आज या खेळातून प्रचंड ग्लॅमर, पैसा, नाव, किर्ती मिळत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस क्रिकेटकडे मुला-मुलींचा कल वाढत आहे. अहिल्यानगरच्या या लाल मातीतील क्रिकेट क्रांतीने हे स्पष्ट केले आहे की, जर योग्य संधी, पायाभूत सुविधा आणि उत्तम प्रोत्साहन मिळाले, तर ग्रामीण आणि निमशहरी भागातील खेळाडूदेखील देशाच्या सर्वोच्च क्रिकेट व्यासपीठावर मानाचे स्थान मिळवू शकतात.
नक्षत्रांसारख्या चमकणार्याि महिला क्रिकेटपटू…
अहिल्यानगरच्या लेकींनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राज्याच्या आणि राष्ट्रीय पातळीवर आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. क्रिकेटपटू आरती केदार हीने बीसीसीआय वुमेन्स प्रीमियर लीग (महाराष्ट्र), तसेच सलग 16, 19 आणि 23 वर्षांखालील नॅशनल कॅम्प क्रिकेट अकादमी 2024 च्या चॅलेंजर ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आपली ओळख निर्माण केली आहे. अंबिका वाटाडेने 14, 15, 19 वर्षांखालील संघातून लक्षवेधी कामगिरी केली. तसेच इंडिया ‘अ’, नागालँड संघात निवड होऊन तिने आपली चमक दाखवली आहे.
ग्रीशा कटारियाने 15 वर्षांखालील नॅशनल क्रिकेट अकादमी आणि 19 वर्षांखालील संघात चमकदार कामगिरी केली. श्रेया गडाखने 19 वर्षांखालील महाराष्ट्र संघात स्थान पटकाविले. संस्कृती घोरताळेने 15 आणि 17 वर्षांखालील महाराष्ट्र संघात सातत्यपूर्ण प्रतिनिधित्व केले. जितेश्री ढमाले हिने 15, 17 आणि 19 वर्षांखालील अशा तिन्ही वयोगटात उत्कृष्ट कामगिरी केली.
स्वामिनी बेलेकरने 15 आणि 17 वर्षांखालील महाराष्ट्र संघात लक्षवेधी कामगिरी केली. समृद्धी शिंदे हिने महाराष्ट्र वुमन प्रीमियर लीगमध्ये आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. मानीनी वायाळने 17 वर्षांखालील महाराष्ट्र संघात स्थान मिळविले. ऋतुजा काळेने महाराष्ट्र प्रीमियर लीग (वुमेन्स) मध्ये सहभाग घेतला. आर्या यरागुटवार, श्रेया शिंदे आणि साईश्री चौरे या तिन्ही खेळाडूंनी 15 वर्षांखालील महाराष्ट्र संघात स्थान मिळवत नगरचा नावलौकिक वाढवला.
निवड चाचण्यांमधील अभूतपूर्व उत्साह..
अहिल्यानगरमध्ये होणार्या जिल्हास्तरीय निवड चाचण्यांना खेळाडूंचा मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा आहे. 14 वर्षाखालील वयोगटात तब्बल 350 खेळाडू कसून सराव करून मैदानात उतरतात, ज्यातून 14 जणांचा अंतिम जिल्हा संघ निवडला जातो. 16 वर्षाखालील वयोगटासाठी 200 मुलांची, 19 वर्षाखालील गटासाठी 150 मुलांची चुरस पाहायला मिळते. खुल्या गटातील 12 खेळाडूंसाठी आणि 120 मुलांची निवड चाचणी घेतली जाते. त्याचप्रमाणे मुलींच्या 15 वर्षाखालील आणि 19 वर्षाखालील आणि खुल्या गटासाठी स्वतंत्र चाचण्या घेऊन पारदर्शक पद्धतीने संघ निवडले जातात.
किरण चोरमले, अनुपम संकलेचा, अझीम काझीची छाप..
किरण चोरमले, अनुपम संकलेचा, अझीम काझी आदी अहिल्यानगरच्या खेळाडूंनी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. असीम काझीने रणजी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये सलग तीन वर्षे कर्णधारपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. किरण चोरमले यानेही 19 वर्षाखालील भारतीय ‘अ’ संघाचा कर्णधार म्हणून धुरा सांभाळली.
आशियाई कपसाठी 19 वर्षाखालील संघात त्याची निवड झाली आहे. अभिषेक घुलेने 14 वर्षांखालील संघाचे नेतृत्व केले आहे. रौनक अंदानी हा 14 वर्षांखालील महाराष्ट्र संघ, 19 वर्षांखालील विनू मंकड आणि कूचबेहर संघात निवड होऊन अष्टपैलू कामगिरी करत आहे. अक्षान काझी याने 14 आणि 16 वर्षांखालील महाराष्ट्र संघात स्थान मिळविले. अजय बोरूडे, शुभम मैड यांनी 23 वर्षांखालील महाराष्ट्र संघात नगरच्या गुणवत्तेचे प्रतिनिधित्व केले.
अनुपम संकलेचा हा सलग 15 वर्षे महाराष्ट्राचे रणजी क्रिकेटमध्ये प्रतिनिधीत्व केले असून सध्या त्यांच्याकडे 16 वर्षांखालील खेळाडूंच्या गोलंदाजी प्रशिक्षणची जबाबदारी आहे. करणारा दिग्गज गोलंदाज आहे. तो सध्या आपल्या अनुभवाच्या जोरावर आयपीएलमध्ये ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ संघाचा सपोर्ट स्टाफ म्हणून कार्यरत आहे. विजय मर्चंट क्रिकेट स्पर्धेत आशिष भांबरे, संदीप आटोळे व गोरक्ष अदानी यांचा सहभाग घेतला.






