National Sports Day : लिटल स्टार ते राष्ट्रीय जिम्नॅस्ट…
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे धनकवडीतील साहिल पांडुरंग मरगजेने आपल्या प्रवासातून सिद्ध केले आहे.

National Sports Day : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे धनकवडीतील साहिल पांडुरंग मरगजेने आपल्या प्रवासातून सिद्ध केले आहे. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या साहिलने बालकलाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. नृत्य, अभिनय आणि आता जिम्नॅस्टिक्स अशा विविध क्षेत्रांत आपली गुणवत्ता सिद्ध करत त्याने राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे.
खंडाळा तालुक्यातील कान्हवडी गावाशी मरगजे कुटुंबाची नाळ जोडलेली आहे. मर्यादित साधनसामग्री असतानाही साहिलने मोठी स्वप्ने पाहिली. वडिलांची अपूर्ण राहिलेली क्रीडा स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार त्याने केला. लहानपणापासूनच नृत्याची आवड असलेल्या साहिलने ‘मराठी तारका’, ‘सलाम पुणे’ आणि पुणे नवरात्र महोत्सवासारख्या व्यासपीठांवर आपल्या कलेची छाप पाडली. ‘नटसम्राट’मधील ‘राजा’ ही भूमिका विशेष गाजली.
अभिनय क्षेत्रातही त्याने विविधांगी काम केले. ‘योगीराज’, ‘लव्हशिप’ वेबसिरीज, जाहिराती तसेच ‘हॉट इज सेक्स’, ‘हॉप बॉटल’, ‘सिग्नल एक दिशा’, ‘तडा’, ‘आधार’, ‘जाणीव’, ‘फोटो फ्रेम’ आणि ‘सडकराम’ यांसारख्या लघुपटांतून त्याने प्रभावी अभिनय केला. प्रत्येक भूमिकेत दिसणारी नैसर्गिकता आणि ऊर्जा यामुळे त्याने रसिकांचे लक्ष वेधून घेतले. पुणे नवरात्र महोत्सवात माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या हस्ते बालनृत्य कलाकार म्हणून त्याचा गौरव झाला. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर, अभिनेता नागराज मंजुळे, ज्युनिअर बच्चन आणि अभिनेत्री स्मिता शेवाळे यांच्या हस्तेही त्याला सन्मान मिळाले.
मात्र, कोविड काळात रंगभूमी आणि अभिनय क्षेत्र ठप्प झाले. या संकटामुळे खचून न जाता साहिलने जिम्नॅस्टिक्सकडे आपले लक्ष वळवले. स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया (साई) मध्ये निवड झाल्यानंतर कठोर सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि सातत्याच्या जोरावर त्याने राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली. 2019च्या राष्ट्रीय ट्रॅम्पोलिन व टंबलिंग स्पर्धेत साहिलने रौप्यपदक पटकावले.
त्यानंतर 2023-24 मध्ये केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेतही त्याने रौप्यपदक मिळवले. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अनेक सुवर्ण व रौप्यपदके, तसेच जिल्हा स्तरीय सात पारितोषिके त्याच्या खात्यावर आहेत. ट्रॅम्पोलिन व टंबलिंगमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत त्याने ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेतही सहभाग घेतला.
साहिलच्या क्रीडा कामगिरीची दखल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी घेतली. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, एटीएस प्रमुख भानुप्रताप बर्गे, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे, मिटकॉन फाउंडेशनचे चेअरमन डॉ. प्रदीप बावडेकर, पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख आणि शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या उपस्थितीत त्याचा सन्मान करण्यात आला. मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभातही आंतरमहाविद्यालयीन जिमनॅस्टिक स्पर्धेतील कामगिरीबद्दल त्याचा गौरव झाला.
पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झालेल्या प्रशिक्षक परीक्षेत ‘अ’ ग्रेड मिळवत ‘सर्वोत्तम शिस्त’ पुरस्कार मिळवणे, ही त्याच्या मेहनतीची आणखी एक ठोस पावती ठरली. ‘भास्कर भूषण स्टार आयकॉन-2025’, पुणे महापालिकेची क्रीडा शिष्यवृत्ती आणि उदयोन्मुख खेळाडू पुरस्कारासह त्याला विविध सन्मान मिळाले आहेत. या यशामागे वडील आणि पत्रकार पांडुरंग मरगजे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. मुलातील कला आणि क्रीडा गुण ओळखून त्यांनी प्रत्येक टप्प्यावर त्याला साथ दिली. आता साहिलचे लक्ष्य आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे आहे.






