National Sports Day : पर्वत, पायवाटा आणि साहसाची क्रीडादृष्टी
राष्ट्रीय क्रीडादिनाच्या निमित्ताने क्रीडेचा विचार करताना आपल्यासमोर सहसा मैदानावरील खेळ येतात.

National Sports Day : राष्ट्रीय क्रीडादिनाच्या निमित्ताने क्रीडेचा विचार करताना आपल्यासमोर सहसा मैदानावरील खेळ येतात. मात्र, निसर्गाच्या सानिध्यात खेळल्या जाणार्या गिर्यारोहण, ट्रेकिंग आणि इतर साहसी क्रीडाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. या क्रीडांचे वैशिष्ट्य म्हणजे येथे शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक ताकद, शिस्त, तांत्रिक ज्ञान आणि निर्णयक्षमता यांचीही कसोटी लागते.
ट्रेकिंग ही डोंगरदर्यांतून किंवा विविध नैसर्गिक भूभागांतून केली जाणारी पायी भटकंती असली, तरी गिर्यारोहणाची व्याप्ती अधिक व्यापक आहे. उंच पर्वतरांगांमध्ये चढाई, हवामानाचा अभ्यास, शरीराला उंचीशी जुळवून घेण्याची प्रक्रिया, बर्फ आणि खडकांवरील तांत्रिक चढाई, दोरखंड आणि सुरक्षा उपकरणांचा वापर अशा अनेक बाबी गिर्यारोहणाचा भाग असतात. त्यामुळे केवळ उत्साह पुरेसा नसून योग्य प्रशिक्षण आणि तयारी आवश्यक असते.
साहसी क्रीडा म्हणजे केवळ थरार किंवा धोक्याचा शोध नव्हे. खरे साहस म्हणजे संभाव्य धोके ओळखून, आवश्यक सुरक्षा उपाय करून आणि परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेत पुढे जाणे. पर्वतावर हवामान कधीही बदलू शकते. काही वेळा शिखर अगदी जवळ असतानाही माघार घ्यावी लागते. अशा वेळी सुरक्षित परत येणे हेच यश मानले जाते.
गिर्यारोहणातून संघभावना, नेतृत्व, संयम आणि निसर्गाबद्दलची संवेदनशीलता विकसित होते. सह्याद्रीतील गडकोटांपासून हिमालयातील उंच शिखरांपर्यंतचा प्रवास माणसाला केवळ भौगोलिक उंचीच नाही, तर स्वतःच्या क्षमतांचीही ओळख करून देतो.
आजच्या तरुण पिढीने साहसी क्रीडांकडे केवळ छंद म्हणून न पाहता प्रशिक्षण, शिस्त आणि जबाबदारीच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण पर्वतावरचा प्रत्येक प्रवास आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतो, मर्यादा ओळखा, त्यासाठी तयारी करा आणि योग्य वेळी पुढे जाण्याइतकीच योग्य वेळी थांबण्याचीही तयारी ठेवा.
राष्ट्रीय क्रीडादिन हा महान खेळाडूंच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस आहे. त्याच वेळी क्रीडेच्या त्या अनेक वाटांकडे पाहण्याचाही दिवस आहे, ज्या कदाचित मुख्य प्रवाहातील प्रकाशझोतात नेहमी येत नाहीत. गिर्यारोहण, ट्रेकिंग आणि साहसी क्रीडा ही केवळ थरार शोधणार्यांची दुनिया नाही. ती शिस्त शिकवणारी, निसर्गाशी नाते जोडणारी, शरीर आणि मनाला आव्हान देणारी आणि माणसाला स्वतःच्या मर्यादांची ओळख करून देणारी जीवनशाळा आहे.
– उमेश झिरपे, ज्येष्ठ गिर्यारोहक व अध्यक्ष, गिरिप्रेमी
मो: 9890620490
E-mail: umzirpegmail.com





