National Sports Day : अहिल्यानगरच्या कुस्ती परंपरेचा दैदीप्यमान पट
ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या मातीने देशाला आणि राज्याला अनेक दिग्गज मल्ल, आंतरराष्ट्रीय पदकविजेते आणि नामवंत वस्ताद दिले आहेत.

National Sports Day : महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव कुस्तीच्या लाल मातीशी अगदी घट्ट विणले गेले आहे. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या मातीने देशाला आणि राज्याला अनेक दिग्गज मल्ल, आंतरराष्ट्रीय पदकविजेते आणि नामवंत वस्ताद दिले आहेत. अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ (नोंदणी 2202) हा ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ’ आणि ‘भारतीय कुस्ती महासंघ’ यांच्याशी संलग्न असून, जिल्ह्यातील तालीम संस्कृती, कुस्तीगीर आणि प्रशिक्षण केंद्रांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. सध्या आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ ‘महाराष्ट्र केसरी’सह इतर स्पर्धांचे यशस्वी आयोजन करत आहे.
महिला कुस्तीतील क्रांती अन् आंतरराष्ट्रीय यश..
अहिल्यानगरच्या कुस्तीने आता केवळ पुरुषांपुरती मर्यादित न राहता महिला कुस्तीतही क्रांती घडवली आहे. पै. भाग्यश्री फंड हिने सलग दोन वेळा ‘महिला महाराष्ट्र केसरी’ची गदा जिंकून ऐतिहासिक पराक्रम केला आहे. तिच्यासोबतच तिची सख्खी बहीण पै. धनश्री फंड आणि महिला पै. अंजली देवकर यांनीही आखाड्यात आपली छाप सोडली आहे. मागील अवघ्या 4 वर्षांत अहिल्यानगरच्या कुस्तीगिरांनी 7 आंतरराष्ट्रीय पदके, 18 राष्ट्रीय पदके, 67 राज्यस्तरीय पदके आणि 2 महिला महाराष्ट्र केसरी गदा जिंकून जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. आंतरराष्ट्रीय पदकविजेत्यांमध्ये पै. सुजय तनपुरे आणि पै. हर्षद चेमटे यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो.
आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली कुस्तीची नवी भरारी
कुस्ती हा केवळ शारीरिक ताकदीचा खेळ नसून ती एक उच्च दर्जाची ‘मल्लविद्या’ आहे, जिथे बुद्धिमत्ता, चपळता आणि योग्य वेळेला मारलेला ‘डाव’ विजयाची दिशा ठरवतो. ताकदीसोबतच समोरच्या मल्लाची हालचाल टिपणे याला कुस्तीत अनन्यसाधारण महत्त्व असते. लाल मातीतील कुस्तीमुळे शरीराला नैसर्गिक ताकद, सहनशीलता आणि घट्ट पकड मिळते, तर आधुनिक मॅटवरील कुस्ती चपळता आणि तांत्रिक कौशल्याचा कस लावते. कुस्तीच्या आखाड्यात अनेक डाव टाकून प्रतिस्पर्धी मल्लाला पराभूत केले जाते. धोबीपछाड, ढाक, घिस्सा, पट काढणे, हप्ता, कल्लेकस, झोळी, एकचाक आदी डावांचा खुबीने वापर मल्ल कुस्ती निकाली काढण्यासाठी करतात. अशाच्या मल्लांची आणि आखाड्यांची देदीप्यमान परंपरा अहिल्यानगर जिल्ह्याला आहे.
अहिल्यानगरच्या लाल मातीचा इतिहास स्व. पै. छबुराव लांडगे, स्व. पै. शंकर अण्णा घुले, स्व. अरुणकाका जगताप, स्व. पै. शिवाजीराव कर्डिले, स्व. पै. किसनसिंग परदेशी, स्व. पै. सहादू गुंजाळ, स्व. पै. रमेश शेळके, स्व. सोमनाथ लोंढे, स्व. पै. रामचंद्र शेळके, स्व. पै. आप्पा हरबा, स्व. पै. आप्पा खताडे, स्व. पै. मुरलीधर भोसले आणि स्व. पै. बागजीबा पवार यांसारख्या महान मल्लांच्या पराक्रमाने समृद्ध आहे.
जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची पहिली मानाची गदा 1986 मध्ये राहुरीचे सुपुत्र पै. गुलाबभाऊ बर्डे यांनी सोलापूर येथे मिळवून दिली. त्यानंतर 1997 मध्ये देवळी (वर्धा) येथे श्रीगोंद्याचे पै. अशोकभाऊ शिर्के पाटील यांनी दुसरी गदा जिंकून जिल्ह्याचा गौरव वाढवला. याशिवाय उत्तर महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणार्यांमध्ये पै. युवराज करंजुले, पै. पवन भिंगारे, पै. योगेश पवार, पै. प्रताप गायकवाड, पै. आकाश भिंगारे, पै. सुदर्शन कोतकर आणि पै. सागर कोल्हे यांचा समावेश आहे. युवा महाराष्ट्र केसरी पै. विष्णू खोसे यांनीही जिल्ह्याचा ठसा उमटवला आहे.
जिल्ह्यात आज हजारो नवोदित मल्लांना कुस्तीचे धडे देण्यासाठी जुने-जाणते वस्ताद अहोरात्र मेहनत घेत आहेत. पै. अशोकभाऊ शिर्के, पै. गुलाब बर्डे, पै. अनिल गुंजाळ, पै. सुखदेव अरुण, पै. संतोष भुजबळ, पै. बबनराव काशीद, पै. बापूसाहेब थेटे, पै. युवराज करंजुले, शिवाजी चव्हाण, पै. सखाराम गव्हाणे, पै. रवींद्र कवडे, पै. मंगेश जरे, पै. विजय तोरडमल, पै. गणेश शेळके, पै. प्रवीणदादा घुले, पै. बापू जरे, पै. मिठू मुळे, पै. तानाजी नरके, पै. विष्णू खोसे, पै. शंकर खोसे, पै. शकील शेख, पै. संदीप गायकवाड, पै. सोमनाथ राऊत, पै. हनुमंत फंड, पै. राजेश जाधव, पै. गणेश शेजूळ, पै. गणेश दसपुते, पै. संभाजी जाधव, पै. गणेश जाधव, पै. युवराज पठारे, पै. बंटी गुंजाळ, पै. अशोक शिरसाठ, पै. प्रमोद गोडसे, पै. नामदेव रोहोकले, पै. धनंजय खर्से, पै. मधुकर उचाळे, पै. उमेश भागानगरे, पै. पोपट शिंदे, पै. कोंडीभाऊ नरसाळे, पै. शैलेश रोहोकले, पै. बाळू वाघ, पै. शिवाजी कराळे, पै. जालिंदर चत्तर, पै. भरत नायकल, पै. संदिप कावरे, पै. अतुल कावळे आणि पै. भाऊसाहेब धावडे या सर्व वस्तादांच्या तालमीत उद्याचे चॅम्पियन घडत आहेत. तसेच, कुस्तीगीर संघाकडे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय दर्जा असलेल्या 20 पंच व तांत्रिक अधिकार्यांचा मजबूत पॅनल आहे.
आधुनिक कुस्तीच्या गरजा लक्षात घेता, अहिल्यानगर शहरातील वाडियापार्क येथे सुसज्ज मॅटवरील कुस्ती प्रशिक्षण केंद्र (कुस्ती हॉल) उभारण्यासाठी जिल्हा कुस्तीगीर संघ प्रयत्नशील आहे. वाडियापार्क येथे आधीच मोकळे मैदान, जीम, लाल मातीचा आखाडा आणि स्टेडियमच्या पायर्या उपलब्ध असल्याने येथे अत्याधुनिक हॉल झाल्यास खेळाडूंना माती आणि मॅट अशा दोन्ही प्रकारच्या कुस्तीचे उत्तम प्रशिक्षण एकाच छताखाली मिळेल, यासाठी आमदार संग्राम जगताप प्रयत्नशील आहेत. अहिल्यानगरची कुस्ती परंपरा ही केवळ खेळाचा भाग नसून तो जिल्ह्याचा स्वाभिमान आहे. योग्य पायाभूत सुविधा आणि वस्तादांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर हा जिल्हा आगामी काळात देशासाठी अनेक ऑलिम्पिक आणि जागतिक विजेते मल्ल घडवेल.
वाडिया पार्कच्या कायापालटासाठी आ. संग्राम जगतापांचे पुढचे पाऊल..
अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून 2025 मध्ये अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाने 67 व्या महाराष्ट्र केसरीचे उत्कृष्ट आयोजन केले होते. विविध गटातील विजेत्या खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर बक्षिसे दिली. महाराष्ट्र केसरी किताब पटकाविलेल्या पै. पृथ्वीराज मोहोळला ‘महिंद्रा थार’ देण्यात आली होती. स्पर्धेत उपविजेता ठरलेला महेंद्र गायकवाड आणि इतर सहभागी मल्लांना तब्बल 18 बुलेट मोटारसायकल, सोन्याच्या अंगठ्या आणि इतर मौल्यवान वस्तू देण्यात आल्या.
याशिवाय वाडिया पार्कमध्ये विविध खेळांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी राज्य शासनस्तरावर पाठपुरावा करून 54 कोटींचा निधी मंजूर केला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध खेळांच्या मैदानांचा अभ्यास करून येथे त्यांची निर्मिती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात त्यातील जवळपास 15 कोटी रुपयांची कामे सध्या वाडिया पार्कमध्ये सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलातच खेळाडूंसाठी दर्जेदार सुविधा निर्माण होणार आहेत. त्याचा फायदा जिल्ह्यातील खेळाडूंना होणार असून राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू मोठ्या संख्येने पोहोचतील.
जिल्ह्यात चार वेळा ‘महाराष्ट्र केसरी’
अहिल्यानगरमध्ये आतापर्यंत चार वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धांचे भव्य आयोजन झाले आहे. 1968 मध्ये पै. मुतनाळ, 1988 मध्ये पै. रावसाहेब मगर, 2014 ला पै. विजय चौधरी, 2025 मध्ये पै. पृथ्वीराज मोहोळ हे महाराष्ट्र केसरीचे मानकरी ठरले आहेत.






