Nasrapur Case Verdict: ऐतिहासिक निकाल! ‘या’ ३ कलमांखाली फाशीची शिक्षा; न्यायालयाचा सर्वात कठोर निर्णय
Nasrapur Case Verdict: अल्पवयीन चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी न्यायालयाचा कठोर निर्णय; विविध कलमांखाली स्वतंत्र शिक्षाही लागू.

Nasrapur Case Verdict – अल्पवयीन मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खून केल्याचे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचे नमूद करत आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. याशिवाय विविध कलमांअंतर्गत स्वतंत्र शिक्षाही ठोठावण्यात आल्या. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अत्यंत संवेदनशील ठरलेल्या या प्रकरणाला कायदेशीरदृष्ट्या महत्त्वपूर्ण वळण मिळाले.
आरोपीच्या वासनेची भूक संपलेली नाही
शिक्षा सुनावताना आरोपीने न्यायालयात स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. घटनेच्या दिवशी आपण घायवळ यांच्या शेडमध्ये गेलो असता, पीडित मुलगी तेथे आली होती. तिला गाठी शेव खायला दिली. गोठ्यात नेताना आपला पाय घसरल्याने मुलीच्या डोक्याला मार लागला आणि ती रडू लागली. त्यानंतर तिला खाटेवर झोपवून आपण तेथून निघून गेलो. लोक आपल्यावर आरोप करतील,
या भीतीने कट्ट्यावर जाऊन बसलो, असा दावा आरोपीने केला. मात्र, तपासातील वैज्ञानिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे न्यायालयाने हा बचाव पूर्णपणे फेटाळून लावत आरोपीला दोषी ठरवले. आरोपी वय ६५ वर्षे असणे ही एकच बाब आरोपीच्या बाजूने जाणारी होती. मात्र, न्यायालयाने त्यावरही आरोपीची याही वयात वासनेची भूक संपलेली नाही, तसेच ही घटना समाजाला हादरवून टाकणारी असल्याचे १३७ पानी निकालात नमूद केले.
कोणत्या कलमांखाली दोषी?
या प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) (अपहरण), कलम ६४ व ६५ (बलात्कार), कलम १०३ (खून), कलम ७४ (विनयभंगाच्या उद्देशाने बळजबरी करणे), कलम १४० (१), तसेच लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ४, ६, ८ आणि १२ अंतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सर्व पुरावे आणि युक्तिवादांचा विचार करून न्यायालयाने आरोपीला सर्व गंभीर आरोपांमध्ये दोषी ठरवल्याची माहिती सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी दिली.




