Narendra Modi : पंजाबची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त; पंतप्रधान मोदींचा आपवर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंजाबमधील आम आदमी पक्ष सरकारवर कट्टर बेइमान म्हणून जोरदार टीका केली. या सरकारच्या ना हेतू स्वच्छ आहेत ना त्यांच्यात प्रामाणिकपणा आहे, अशा शब्दांत मोदींनी तोफ डागली.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंजाबमधील आम आदमी पक्ष सरकारवर कट्टर बेइमान म्हणून जोरदार टीका केली. या सरकारच्या ना हेतू स्वच्छ आहेत ना त्यांच्यात प्रामाणिकपणा आहे, अशा शब्दांत मोदींनी तोफ डागली. पंजाबमध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून पोलीस ठाणीही सुरक्षित राहिलेली नाहीत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
शुक्रवारी जालंधर येथे देशातील २० राज्यांमधील ७५ पुनर्विकसित रेल्वे स्थानकांसह तब्बल ५,४७० कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण व पायाभरणी मोदी (Narendra Modi) यांनी केली. त्यानंतर ते जनसभेला संबोधित करत होते. आगामी २०२७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या दौऱ्याला मोठे राजकीय महत्त्व आहे.
पंजाबमध्ये टोळीयुद्ध (गँगवॉर) आणि गोळीबाराच्या घटना कधीही घडू शकतात, अशी भीती निर्माण झाली आहे. गुंडांकडून उघडपणे खंडणी मागितली जात आहे. पंजाबच्या नावावर मोठी कर्जे घेतली जात आहेत. बजेटचा मोठा हिस्सा हे कर्ज फेडण्यात जात आहे आणि सत्तेत बसलेले लोक या पैशांवर मजा मारत आहेत, असा आरोप मोदींनी (Narendra Modi) केला. केंद्राने पाठवलेला कोट्यवधी रुपयांचा निधी रस्ते, कालवे किंवा मंडई उभारण्यासाठी वापरता आला असता, पण पंजाबमध्ये उघड लूट सुरू आहे, असा टोला त्यांनी लगावला.
काँग्रेसच्या काळात रेल्वेच्या केवळ खोट्या घोषणा व्हायच्या. पंजाब काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी अंतर्गत कलह अद्याप संपलेला नाही. तर दुसरीकडे, शिरोमणी अकाली दल हा पक्ष जनतेच्या कल्याणापेक्षा स्वतःच्याच अंतर्गत वादात व्यस्त आहे, अशी टीका त्यांनी केली. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने पंजाबच्या विकासात कोणतीही कसर सोडली जात नाही.
या दौऱ्यात पंतप्रधानांनी (Narendra Modi) अमृतसर ते वाराणसी दरम्यान संत रविदास एक्सप्रेस या थेट रेल्वे गाडीला हिरवा कंदील दाखवला. यापूर्वी त्यांनी हरियाणामध्ये देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनलाही हिरवा कंदील दाखवला होता. या कार्यक्रमाला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू आणि पंजाब भाजपचे अध्यक्ष केवल सिंह धिल्लो यांच्यासह इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.






