Namdev Shastri : देशमुख कुटुंबीयांना भेटल्यानंतर नामदेव शास्त्रींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी धनजंय मुंडे यांनी भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज संतोष देशमुख यांचे बंधू धनजंय देशमुख त्यांच्या कुटुंबीयांसह भगवानगडावर दाखल झाले आहेत. त्यामुळे भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री हे चर्चेत आले आहेत. धनंजय मुंडे यांना त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हा वाद अधिक चिघळला गेला.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी भगवान गडावर जाऊन महतं नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली. त्यानंतर देशमुख कुटुंबाने हत्या प्रकरणाचे सर्व पुरावे नामदेव शास्त्री यांच्या समोर सादर केले. धनजंय देशमुख यांनी ‘देशमुख कुटुंबीयांनी कधीही जातीवाद केला नाही. माझ्या भावाकडून दलित बांधवाला वाचवण्याचा प्रयत्न झाला’ असे म्हटले. त्यानंतर भगवान गड संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहे, अशी भूमिका नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली. तसेच आरोपींना आम्ही पाठिशी घालणार नाही असे आश्वासन देखील शास्त्री महाराज यांनी देशमुख कुटुंबीयांना यावेळी दिले.
आरोपींची तपासणी झाली पाहिजे : धनंजय देशमुख
धनंजय देशमुख यावेळी म्हणाले, माझ्या भावाने कधीही जात पाहिली नाही. दलित बांधवाला वाचवण्यासाठी तो गेला होता. मात्र, खऱ्या आरोपींची तपासणी झाली पाहिजे. आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून समाजात अशा घटना घडू नयेत, यासाठी योग्य चौकशी होणे आवश्यक आहे, असे धनंजय देशमुख म्हणले.
गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो : नामदेव शास्त्री
नामदेव शास्त्री म्हणाले कि, देशमुख कुटुंब भगवान गडावर श्रद्धा ठेवणारे आहे. अनेक वर्षे त्यांची शेती मुंडे कुटुंबाने केली आहे. त्यामुळे जातीवाद न होता खऱ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला गेला असेल. मात्र, गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. आम्ही कधीही आरोपींचे समर्थन केले नाही. फास्टट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, अशीच आमची देखील भूमिका आहे, असे नामदेव शास्त्री यावेळी म्हणाले.





