Manoj Jarange : “अन् त्यांच्या पोटातील ओठावर आले…”; जरांगेंची नामदेव शास्त्रींवर तिखट शब्दात टीका

Namdev Shastri | Manoj Jarange | Santosh Deshmukh : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आंदोलन देखील केले जात आहेत. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक केली असून त्यांना मकोका लावण्यात आला आहे. तर वाल्मिक कराड यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करून त्यांनाही मकोका लावण्यात आला आहे. या सर्व प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा दावा विरोधक करत आहेत.
दरम्यान, वाल्मिक कराड हे राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याने मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सतत केली जात आहे. असं असताना काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे हे भगवानगडावर मुक्कामी गेले होते. त्यानंतर या प्रकरणात भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी उडी घेत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. त्यानंतर त्यांच्यावर देखील अनेकांनी टीका केल्याचं दिसून आलं.
मात्र, नंतर धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भगवान गडावर भेट घेतली. यावेळी त्यांनी नामदेव शास्त्री यांना सर्व पुरावे दाखवले. तसेच संतोष देशमुख यांची हत्या का झाली? या हत्यामागे कोण होते? याचा लेखाजोखाच त्यांच्यासमोर मांडला. यावेळी नामदेव शास्त्री यांनी भगवान गड हा देशमुख कुटुंबीयांच्या पाठिशी असल्याचं स्पष्ट केलं आहे.
या भेटीवर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की, “जे दिसायला हवं होतं राज्याला ते दिसलं आहे. आम्हाला जातीयवादी ठरवत होते. ज्या ठिकाणाहून अपेक्षा नव्हती तिथून जातीयवाद सुरू झाला. त्यांचे शब्द चुकीचे होते. विखारी होते. जातीय होते.
आरोपींची बाजू घेऊन त्यांची मानसिकता तपासायची आणि संतोष भैय्याच्या मागे राहायचं नाही, हे विखारी शब्द लोकांनी पाहिले. राज्य हळहळलं. ज्या ठिकाणाहून अपेक्षा नव्हती तिथून हे शब्द आलेच कसे? एखादा नेता किंवा कार्यकर्त्याकडून एखादा शब्द जात असतो. पण उच्चकोटीच्या व्यक्तीने असं बोलणं महाराष्ट्राचं मोठं दुर्देव आहे. या निमित्ताने पोटातील विचार ओठावर आले. राज्याने प्रत्यक्ष पाहिले, असं मनोज जरांगे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मी बाबांना दोष दिला नाही. त्या दिवशीही दिला नाही, आजही देत नाही. त्यांच्याकडून हे सर्व करून घेणारी टोळी विचित्र आहे. स्वत:चं पाप झाकण्यासाठी देवधर्मही ते पाहत नाहीत. विचित्र टोळी आहे. ही टोळी संपली पाहिजे, असं जरांगे यांनी सांगितलं.





