आधी पाठराखण, टीकेनंतर युटर्न? संतोष देशमुख प्रकरणात नामदेव शास्त्रींनी नेमकी काय भूमिका घेतली…

Namdev Shastri : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आंदोलन देखील केले जात आहेत. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक केली असून त्यांना मकोका लावण्यात आला आहे. तर वाल्मिक कराड यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करून त्यांनाही मकोका लावण्यात आला आहे. या सर्व प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा दावा विरोधक करत आहेत.
दरम्यान, वाल्मिक कराड हे राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याने मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सतत केली जात आहे. असं असताना काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे हे भगवानगडावर मुक्कामी गेले होते. त्यानंतर या प्रकरणात भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी उडी घेत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली.
धनंजय मुंडे खंडणी प्रकरणात गुन्हेगार नाहीत हे मी शंभर टक्के खात्रीने सांगतो असं वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वत्र टीकेची झोड उठवली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका महंत पदावर असणाऱ्या व्यक्तीने अप्रत्यक्षपणे निर्घृण हत्या करणाऱ्यांची पाठराखण केली का? अशाही चर्चाही जोर धरू लागल्या. त्यानंतर मात्र नामदेव शास्त्री सानपांची भूमिका बदलल्याचे पाहायला मिळाली.
मी कधीही हत्येला पाठिंबा दिलेला नाही : नामदेव शास्त्री
नामदेव शास्त्री म्हणाले, धनंजय मुंडे यांची अवस्था आणि त्यांची मानसिकता याला मी आधार दिला. मी त्यांना हे सांगितलं की माझा त्यांना पाठिंबा आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जे कोणी आरोपी असतील त्यांना फाशी व्हावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. मी कधीही हत्येला पाठिंबा दिलेला नाही. मी वारकरी आहे. माणूस मारल्यानंतर आम्ही त्याला पाठिंबा देऊ असे तुम्हाला का वाटतं? असा प्रश्न नामदेव शास्त्री यांनी केला.
एक चापट मारली म्हणून निर्घृण खून : धनंजय देशमुख
संतोष देशमुखने ज्या आरोपीला चापट मारली, त्या चापट मारलेल्या आरोपीवर 22 गुन्हे आहेत. एक चापट मारली म्हणून त्यांनी एवढा निर्घृण खून केला. एका चापटेच्या बदल्यात त्यांनी आम्हाला 10 चापट मारल्या असत्या तरी चाललं असतं, असं म्हणत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख यांनी आपली भूमिका मांडली.
त्यानंतर आज (२ फेब्रुवारी) संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली. तसेच देशमुख कुटुंबाने हत्या प्रकरणाचे सर्व पुरावे नामदेव शास्त्री यांच्या समोर सादर केले. यावर नामदेव शास्त्री यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, भगवान गड संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी असून आरोपींना आम्ही पाठिशी घालणार नाही असं म्हणत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर पडदा टाकला.
कोण आहेत महंत नामदेव शास्त्री?
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीत असलेल्या भगवान गडाचे नामदेव शास्त्री हे महंत आहेत. भगवान गड हा वंजारी समाजाचं श्रद्धास्थान असून दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी गडावर लाखो भाविक येत असतात. 2016 मध्ये भगवान गडावर राजकीय भाषण नको यासाठी नामदेव शास्त्रींनी मंत्री पंकजा मुंडेंना विरोध केला होता. त्यावरून मोठा संघर्ष देखील पाहायला मिळाला. अखेर पंकजा मुंडे यांनी भगवान गडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेतला होता. त्यानंतर 2017 ला भगवान बाबा यांचं गाव सावरगावात पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगड स्थापन केला. तेव्हापासून पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावातच होतो.





