Najmul Islam Sacked by BCB : बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आणि खेळाडूंमध्ये सुरू असलेला हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपुष्टात आला आहे. माजी कर्णधार तमीम इक्बालला ‘भारतीय एजंट’ म्हणणारे आणि खेळाडूंचा अपमान करणारे वित्त समितीचे अध्यक्ष नझमुल इस्लाम यांची बोर्डाने पदावरून हकालपट्टी केली आहे. खेळाडूंनी पुकारलेल्या आक्रमक संपामुळे बोर्डाला हा मोठा निर्णय घ्यावा लागला. खेळाडूंच्या एकजुटीचा विजय; ‘BPL’चा सामना रद्द – नजमुल इस्लाम यांच्या विधानांविरुद्ध बांगलादेशी खेळाडू प्रचंड संतापले होते. ‘नोआखली एक्सप्रेस’ विरुद्ध ‘चटगाव रॉयल्स’ या बीपीएल (BPL) सामन्यात दोन्ही संघ मैदानात उतरलेच नाहीत, ज्यामुळे टॉस देखील होऊ शकला नाही. जोपर्यंत नजमुल राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत क्रिकेटवर बहिष्कार टाकण्याचा इशारा खेळाडूंनी दिला होता. खेळाडूंचा हा आक्रमक पवित्रा पाहून बीसीबीने तातडीने कारवाई केली. नजमुल इस्लाम यांच्यावर काय होते आरोप? नजमुल इस्लाम यांनी केवळ तमीम इक्बालवरच वैयक्तिक टीका केली नव्हती, तर खेळाडूंच्या मानधनाबाबतही अपमानजनक विधाने केली होती: अपमानजनक टीका: तमीम इक्बालला “भारतीय एजंट” संबोधले. टी-२० वर्ल्ड कपवर प्रश्नचिन्ह: पुढच्या महिन्यात भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी बांगलादेशच्या सहभागावर अवाजवी भाष्य केले. मानधनाला नकार: “खेळाडूंनी अद्याप आपली कामगिरी सिद्ध केलेली नाही, त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही,” असे म्हणत त्यांनी खेळाडूंच्या जखमेवर मीठ चोळले होते. हेही वाचा – BPL Boycott Threat : बांगलादेश क्रिकेटमध्ये मोठा वाद! खेळाडूंनी स्वत:च्याच देशात न खेळण्याचा दिला इशारा बोर्डाने अधिकृत निवेदनात काय म्हटले? परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून बीसीबीने अधिकृत पत्रक जारी केले. संस्थेच्या हितासाठी आणि क्रिकेटच्या सुचारू संचालनासाठी नजमुल इस्लाम यांना वित्त समितीच्या अध्यक्षपदावरून तत्काळ प्रभावाने मुक्त करण्यात येत आहे. बीसीबी अध्यक्षांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून हा निर्णय घेतला असून, पुढील सूचना मिळेपर्यंत ते स्वतः या समितीचा कार्यभार सांभाळतील, असे बोर्डाने स्पष्ट केले. हेही वाचा – Henil Patel Bowling : कोण आहे हा हेनिल पटेल? ज्याच्या स्विंगसमोर अमेरिकेच्या निम्म्या संघाने टेकले गुडघे तसेच, खेळाडूंचे हित ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. खेळाडूंनी व्यावसायिकता दाखवून पुन्हा मैदानात उतरावे आणि बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही बोर्डाने केले आहे.