दिव्याचा सत्कार.! नागपूरची बुद्धीबळ कन्या जागतिक विजेती, फडणवीसांनी सांगितला मंत्रिमंडळातील मजेदार किस्सा

नागपूर : भारतीय बुद्धीबळपटू आणि नागपूरची कन्या दिव्या देशमुख हिने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकून तिरंगा जगभरात फडकवला आहे. या दैदिप्यमान कामगिरीबद्दल महाराष्ट्र सरकारतर्फे नागपूर येथे आयोजित सत्कार सोहळ्यात तिचा गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्याच्या यशाने तिहेरी अभिमान वाटत असल्याचे सांगितले.
यावेळी भारत, महाराष्ट्र आणि नागपूरसाठी फडणवीसांनी मंत्रिमंडळातील एक मजेदार किस्सा सांगितला, “छगन भुजबळ म्हणाले, नागपूरचे लोक बुद्धिबळात हुशार असतात, पण आम्ही राजकारणात बुद्धिबळ खेळतो आणि चेकमेटही करतो!” या मिश्कील टिप्पणीने उपस्थितांमध्ये हशा पिकला.
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचे पहिले भाषण+
नवनिर्वाचित क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या पहिल्या भाषणात दिव्याचे कौतुक करताना सांगितले, “दिव्याने महाराष्ट्र आणि देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. ती केवळ भारताची कन्या नाही, तर महाराष्ट्राची मृदूलता आहे. मुलींना संधी मिळाली, तर त्या जग जिंकू शकतात, हे दिव्याने दाखवून दिले.” त्यांनी मुलींसाठी क्रीडा क्षेत्रात विशेष योजना आणण्याची घोषणा केली आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात क्रीडा विभागाला अग्रेसर ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. “दिव्या, तुझ्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले.
हा सत्कार माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण
सत्कार सोहळ्यात बोलताना दिव्या देशमुख म्हणाली, “हा सत्कार माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. महाराष्ट्र सरकारने मला नेहमीच पाठबळ दिले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या सामन्यामुळे मला वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळाली. नागपूर माझे घर आहे, आणि मला येथे खेळताना नेहमीच प्रेरणा मिळते. माझे पुढील लक्ष्य वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, आणि मी पहिली नागपूरकर मुलगी बनण्याचा प्रयत्न करेन, जिला हा सन्मान मिळेल.”
दरम्यान, फडणवीस म्हणाले, “दिव्यामुळे मंत्रिमंडळातही आमचा सन्मान वाढतो. तिच्या यशाने सर्वांना प्रेरणा मिळाली आहे.” या सत्कार सोहळ्याने नागपूरच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानावर शिक्कामोर्तब झाले असून, दिव्याच्या पुढील प्रवासाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.





