प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नावीन्यतेचे केंद्र असून, नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यमातून तयार होणारा विकास आरखडा महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.नीती आयोग, महाराष्ट्र शासन आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या संयुक्त विद्यमाने यशदा येथे आयोजित पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हबच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे प्रमुख पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे आदी उपस्थित होते.