नगर : बांधकाम कामगारालाही आता हक्काचे घर मिळणार कधी?

हक्काच्या निवाऱ्यासाठी दुसऱ्यांचे इमले बांधणाऱ्यांची स्वप्नपुर्तीच्या न्यायहक्कासाठी लढा सुरु
राजेंद्र वाघमारे
नेवासा : दुसऱ्यांचे इमले बांधून स्वत: मोडक्या पत्र्याच्या खोलीत राहणाऱ्या बांधकाम कामगारालाही हक्काचे घर मिळणार या आशेपायी सुमारे दीड ते दोन वर्षांपासून नेवासा तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगार हे वेळोवेळी घरकुल मिळण्यासाठी एकजुटीने लढा देत असतात. असे असले तरी या बांधकाम कामगारांच्या लढ्याला यश प्राप्त होत नसल्यामुळे निवाऱ्याच्या मागणीसाठी कामगारांनी आपला मुक्काम कुटूंबियांसह अ.नगर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणामध्ये केलाय. कामगार आपला छोटासा संसार थाटून आंदोलनाच्या पाविञ्यात उतरला आहे. तरी शासनाचे ‘वराती मागून घोडे’ दमटण्याचा प्रकार सुरु आहे. त्यामुळे आता बांधकाम कामगारांनी आपल्या हक्काच्या निवाऱ्यासाठी आर या पारच्या लढ्यात उतरुन संघटीतपणे न्यायहक्काच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र केलं.
गेंड्याची कातड्याचे पांघरुन घेतलेल्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्याद्वारे राबवण्यात येणाऱ्या नोंदीत कामगारांसाठी असलेली घरकुल योजना राबवण्यासाठी या विभागाकडे कोणतीही यंत्रणा नाही असे समोर आलेले आहे चक्क १७००० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता असूनही या महामंडळाला घरकुल योजना राबवण्यासाठी शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारावर अवलंबून राहावे लागते ही एक शौकांतिका असल्याचा गंभीर आरोप बांधकाम कामगारांनी केला आहे.
बांधकाम कामगारांनी घरकुल योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे त्यांनी बांधकाम कामगार मंडळाच्या अहमदनगर येथील कार्यालयात जमाही केलेली आहेत असे असतांनाही मंडळाने अद्याप त्यांना घरकुलासाठी रक्कम अदा करण्याच्या बाबतीमध्ये कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही त्यामुळे आजघडीला बहूतांशी बांधकाम मजूर हे झोपडीमध्ये राहत असून रोजंदारीने उपजीविका करत आहेत अनेक वेळा शासनदरबारी हेलपाटे मारूनही त्यांचा काहीएक उपयोग होतांना दिसत नसल्यामुळे बांधकाम कामगार व्यथित झालेले आहेत ही एक दुर्देवी बाब असल्याचा आरोप बांधकाम कामगार मजुरांनी केला आहे.
गेल्या दीड – दोन वर्षांपासून पावसाळ्याच्या हालाखीच्या वेदनांचा सामना कामगारांनी केलेला असतांना यंदाचा पावसाळाही आता चक्क घरात छत्री धरून काढावा लागेल की, काय? या विवंचनेत बांधकाम कामगार यावर्षीही आपला चिखलात संसार करावा लागत असल्यामुळे बांधकाम कामगार मजूर हा वैतागून आता जिल्हा कामगार कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आश्रयासाठी दाखल झालेला आहे. बांधकाम कामगार आता न्यायहक्काच्या लढाईसाठी आर या पारच्या भूमिकेत आंदोलनात उतरलेला आहे. आता जोपर्यंत त्यांना हक्काचे पक्के घर मिळत नाही, तोपर्यंत बांधकाम कामगार जिल्हा कामगार कार्यालयाच्या आवारात मुक्काम ठोकणार असल्याची खमकी भूमिका बांधकाम कामगारांनी घेतलेली आहे. सहकुटुंब सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणामध्ये संसार थाटलेला आहे. या बांधकाम कामगारांकडे दुसरा कुठलाही पर्याय आता शिल्लक राहीलेला नसल्यामुळे नाईलाजास्तव त्यांनी कामगार कार्यालयात आश्रय घेण्याचा कटू निर्णय घेतलेला आहे.
याबाबत अधिक चौकशी केली असता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्याद्वारे राबवण्यात येणाऱ्या नोंदीत कामगारांसाठी असलेली घरकुल योजना राबवण्यासाठी या विभागाकडे कोणतीही यंत्रणा नाही असे समोर आलेले आहे चक्क १७००० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता असलेल्या या महामंडळाला घरकुल योजना राबवण्यासाठी पंचायत समितीच्या कारभरावर अवलंबून राहावे लागते ही एक शौकांतिका आहे.प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यप्रणालीवर अवलंबून राहून मंडळ फक्त घरकुल योजनेमध्ये वेळ काढूपणा करत आहे ? असा बांधकाम कामगार आंदोलकांचा आरोप आहे.
बांधकाम कामगार मंडळाच्या मध्यान्ह भोजन योजना, आरोग्य तपासणी योजनांव्दारे मजुरांचा काहीही फायदा होत नसून योजना चालवणारे ठेकेदारांचाच यामध्ये मोठा फायदा होत आहे ठेकेदार धर्जिण्या योजना मंडळाकडून तत्परतेने चालवल्या जातात आणि नोंदीत कामगाराला फायदा देणाऱ्या योजनेमध्ये मंडळ द्रविडी प्राणायाम करत असते असा अनुभव कामगारांनी यावेळी आपल्या व्यथा मांडतांना व्यक्त केलेला आहे.यावेळी झालेल्या सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या दालनात याविषयी झालेल्या बैठकीत सर्व कामगारांच्या घरकुलाची प्रक्रिया येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले गेले. माञ कामगारांच्या आशा मावळलेया गेल्यामुळे बुधवार (दि.१९) रोजी दुपारी एक वाजता नेवासा नगरपंचायतच्या दालनासमोर अधोरेखित केलेल्या १५ ते १७ मुद्द्यांवर प्रशांत खांडेकर सहआयुक्त नगरपालिका प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या पुढाकाराने व्हिडिओ कॉन्फसिंगद्वारे बैठक आयोजित केली आहे. समर्पण फाऊंडेशनसह ज्या – ज्या मान्यवरांनी यापूर्वी गांव पातळीवर हे विषय हाताळले आहे. अशा सर्व मान्यवर या बैठकीसाठी आमंत्रित केलेले आहेत. या लढ्यामध्ये बांधकाम कामगार गणेश थोरे, काकासाहेब खाटीक,देविदास खाटीक,गणेश खेडेकर, रोहिदास खाटीक,रवींद्र मकासरे,किरण गायकवाड हे सहकुटुंब उपस्थित होते. या आंदोलनाचे नेतृत्व रंगनाथ डुकरे व कृष्णा डहाळे यांनी केले.





