Nagar : राजकीय कुस्त्या लावण्यासाठी पारनेर माहीर ; डॉ. सुजय विखे

पारनेर : माजी सभापती बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक असल्याचे सांगत पारनेर तालुका राजकीय कुस्त्या लावण्यासाठी देखील माहीर आहे, असा टोला माजी खासदार डाॅ.सुजय विखे यांनी लगावला.
अंबिका माता यात्रा उत्सवानिमित्ताने माजी सभापती बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशन यांच्यावतीने गोरेगाव येथे भव्य कुस्तीचा जंगी आखाडा व मैदान पार पडले. पै. कोंडीबा तांबे यांच्याहस्ते आणि सबाजीराव देठे, शिवाजीराव शेरकर यांच्या उपस्थितीत मैदान पूजन करण्यात आले. माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनी सबंध आखाड्याची पार्श्वभूमी आणि रचना जाहीर केल्यानंतर आखाड्याला प्रत्यक्ष सुरुवात झाली.
या कुस्ती मैदानाला अनेक राजकीय दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक आहे असे गौरवोद्गार काढले. आमदार काशिनाथ दाते यांनी कुस्ती मैदानाचे कौतुक केले. या कुस्ती मैदानासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे, मुळा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापूसाहेब शेटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश गडाख पाटील, आखाड्याचे मुख्य प्रवर्तक माजी सभापती बाबासाहेब तांबे, एस. बी.शेटे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, उद्योजक मुबारक शेख, युवा उद्योजक शुभम पाटील, बाजार समितीचे संचालक शंकरराव नगरे, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, माजी सभापती अरुणराव ठाणगे, एकनाथ गुंड, राम गुंड, गोरक्षनाथ गुंड, सरपंच डॉ. राजेश भनगडे, सरपंच अप्पासाहेब शिंदे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या मैदानात कोल्हापूर, पुणे,सातारा, नाशिक, अहिल्यानगर आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास ४०० मल्लांनी सहभाग नोंदवला. यामध्ये १०० रुपयांपासून शेवटची कुस्ती दोन लाख ११ हजारपर्यंत लावण्यात आली होती. अनेक नामवंत मल्लांनी या मैदानाला उपस्थिती दर्शवली. तालुक्यातील आणि जिल्ह्यातील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मैदानात माऊली जमदाडे, सोनू कुमार (हरियाणा), चेतन रेपाळे, अनिकेत मांगडे, अक्षय कावरे, प्रणित भोसले, सागर देवकाते, अक्षय पवार, विजय पवार, मनोज फुले, अनिल लोणारे, तुषार अरुण, राम वने, भरत होळकर, शाम गव्हाणे, कुमार देशमाने, अरबाज शेख, रोहित आजबे, हृतिक माने, निलेश उचाळे, तेजस उलागड्डी, सौरव मराठे , प्रकाश कार्ले, लौकिक चौगुले, आकाश चव्हाण, देवा खोसे यांसारख्या अनेक नामवंत मल्लांनी चितपट कुस्त्या केल्या. एकेरी पट, दुहेरी पट, ढाक, धोबी, निकाल, कलाजांग, साल्टो बॅक थ्रो अशा अनेक डावांची उधळण या जंगी मैदानाला झाली. शेवटची कुस्ती माऊली जमदाडे आणि सोनू कुमार हरियाणा यांच्यात झाली.
माऊली जमदाडे याने चितपट कुस्ती केली. दुपारी तीन वाजता सुरू झालेला कुस्त्यांचा थरार रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरू होता. लख्ख प्रकाशात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत, हलगीच्या खनखनाटामध्ये कुस्ती शौकीन न्हाऊन निघाले. डोळ्यांचे पारणे फेडणारे मैदान झाले.





