Nevasa : शैनेश्वर देवस्थानच्या अॅप घोटाळ्याला जबाबदार कोण?

नेवासा : शनिशिंगणापूर (ता. नेवासा) येथील जगप्रसिद्ध शनिदेवाच्या दरबारात राज्यासह देश – विदेशातून भाविक – भक्त शनिची साडेसाती सोडविण्यासाठी शनि चौथऱ्यावर येवून नतमस्तक होत असतात. भाविक -भक्तांच्या “श्रद्धेचा बाजार” मांडून भाविकांना देणगी रुपात गंडविण्याचा गैरफायदा घेवून कोट्यावधी रुपयांना गंडा घालणारा अॅप घोटाळा उजेडात आले आहे. अशातच आता भाविक – भक्तांतून राज्यात तीव्र संतपाची लाट उसळलेली आहे.
याबाबत देवस्थान केवळ कागदी घोडे नाचविण्यात दंग असून केवळ चौकशीचा ससेमिरा सुरु असल्याचे दाखवून देवस्थानाच्या नावावर भाविकांची लुट करणारे महाठक अद्यापही उजळ माथ्याने वावरत आहेत. या प्रकरणाला नेमका कोणाचा ‘राजाश्रम’ मिळला? असा संतप्त सवाल शनिशिंगणापूर ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे भाविकांचा मोठ्या प्रमाणात आगडोंब उसळलेला आहे.
राज्यासह देश-विदेशातून श्रद्धेपोटी भाविक-भक्त शनिची साडेसाती घालविण्यासाठी शैनैश्वर देवस्थानामध्ये नतमस्तक होण्यासाठी येत असतात. या भाविक-भक्तांच्या श्रद्धेचा व्होरा ओळखून जेथे चोरीच होत नसल्याची अख्यायिका आहे, या धार्मिक देवस्थानात चक्क लटकूंपासून पार्किंगपर्यंत तर देणगीपासून दर्शनापर्यंत भाविकांना लुटण्याची साखळीच सुरु आहे. आता भाविकांनी न्याय कोणाकडे मागायचा ? असा यक्ष सवाल उपस्थित होत आहे.
कोट्यावधी रुपयांची भाविकांची देणगी रुपात पैसा घेवून हा पैसा देवस्थानला न देता भाविकांचीच फसवाफसवी होवून तिसरेच लोक मालामाल झालेले असताना याकडे कोणीही गांभिर्याने लक्ष घालत नाही. केवळ कागदी घोडे नाचवूनही प्रशासन जर अॅक्शनमोडवर येत नसेल, तर या मागचा खरा सुत्रधार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विश्वास कोणावर ठेवायचा?
अॅप घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांचे सध्या मोठे ‘पेव’ फुटलेले असताना प्रशासन मात्र त्यांच्या तक्रारींवरही लवकर अॅक्शनमोडवर येत नसल्यामुळे केवळ कागदी बाजार मांडून भाविकांच्या श्रद्धेलाच लुटल्याचा प्रकार घडत आहे. यामुळे विश्वास कोणावर ठेवायचा? असा संतप्त सवाल सध्या उपस्थित होतांना दिसून येत आहे.





