नगर : संगमनेरात अवतरली अवघी अयोध्यानगरी

अयोध्येतून आलेल्या मंगल कलशांचे जंगी स्वागत
संगमनेर – श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून आलेल्या श्री. मंगल कलशांची शोभायात्रा संगमनेर शहरातून काढण्यात आली होती. अभिनव नगर येथील श्रीराम मंदिर येथे महाआरती होऊन शोभायात्रेची सुरूवात करण्यात आली.
अयोध्येतील बहुप्रतीक्षित श्रीराम मंदिर उभारणीचे काम अंतिम टप्यात आले आहे. दि. २२ जानेवारीला या मंदिरात भगवान श्रीरामलल्ला यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. यात सर्वांचा सहभाग असावा म्हणून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या येथून आलेल्या श्री. मंगल कलशांच्या अक्षदा दि. १ ते १५ जानेवारी दरम्यान घर- घर “मंगल अक्षदा निमंत्रण अभियान” होणार आहे. यात मंदिराची माहिती व प्रभू श्रीराम यांचा फोटो व मंगल अक्षदा देणार आहे. सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत रामललांच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी विश्वातील करोडो घरांमध्ये दीपोत्सव होणार आहे.
विश्व हिंदू परिषद बजरंग दल संगमनेरच्या माध्यमातून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेत अग्रभागी साधू – संत, महंत, भजनी मंडळ, शंखनाद ढोल पथक, जनता राजा मर्दानी खेळ, विघ्नहर्ता लाइट, महाबली हनुमान, वक्रतुंड डीजे लाइट, साईदर्शन डीजे, लहान मुलांना सजवून श्रीराम पंचायत देखावा रथ, श्री. मंगल अक्षदा कलश रथ, श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांच्या भव्य मूर्तींचा देखावा पाहण्यासाठी व श्री. मंगल कलशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
शोभा यात्रेच्या समारोप प्रसंगी घारगाव, बोटा, साकूर, तळेगाव दिघे, आश्वी, धांदरफळ, संगमनेर शहर या उपखंडांना कलश प्रदान करण्यात आले, यावेळी व्यासपीठावर संघचालक सुभाष कोथमिरे, जोंधळे , संगमनेर ग्रामीण अभियान प्रमुख प्रशांत बेल्हेकर, संगमनेर शहर अभियान प्रमुख कुलदीप ठाकूर, सहप्रमुख भाऊ जाखडी, कमलाकर भालेकर, किरण परेरा उपस्थित होते.संगमनेरातील प्रत्येक चौकाचौकात पुष्पवृष्टी करून मंगल कलश रथाचे स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांची मोठी उपस्थिती होती. महाबली हनुमान पाहण्यासाठी बाल गोपाळांसह अबाल वृद्धांनी शोभायात्रेत मोठी गर्दी केली होती.





