Myra Vaikule| मराठी मालिकेतील बालकलाकार मायरा वायकुळ मोठ्या पडद्यावर काम करण्यास सज्ज होणार आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. त्याच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यात तिने परी नावाची भूमिका साकारली आहे. यानंतर ती ‘नीरजा: एक नयी पहचान’ या हिंदी मालिकेत देखील झळकली होती. आता लवकरच मायरा वायकुळ अभिनेता स्वप्नील जोशीसोबत मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
मायराच्या सोशल मीडियावर अकाउंटवर ही माहिती देण्यात आली आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटात मायरा झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी महिला दिनानिमित्ताने ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला. यामध्ये मुक्ता बर्वे व नम्रता संभेराव हटके अंदाजात पाहायला मिळाली. या चित्रपटात स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते, सुकन्या मोने हे कलाकार देखील असणार आहेत.
View this post on Instagram
चित्रपटाबद्दल सांगत असताना मायरा आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “स्त्री ही घराची राणी असली तरी घर, नोकरी, मूल सांभाळताना अजून दोन हातांची मदत लागतेच! ते वरचे दोन हात असतात मोलकरणीचे! मालकीण- मोलकरणीचे सुर जुळले की गृहिणीची होते महाराणी आणि मोलकरणीची होते परीराणी! ह्या महाराणी-परीराणी, आपल्या हातावर पूर्ण संसार पेलून उभ्या असतात. तुमच्या आमच्या घरातल्या, घर चालवणाऱ्या, घर सांभाळणाऱ्या, दुसऱ्याचं घर सांभाळून आपलं घर चालवणाऱ्या नारीशक्तीला त्रिवार वंदन करून घेवून येत आहोत. ‘नाच गं घुमा’…!” ‘नाच गं घुमा’ हा मायराचा पहिला मराठी चित्रपट असणार आहे. तर या चित्रपटाच्या माध्यमातून स्वप्नील जोशी देखील निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. मे महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे म्हंटले जात आहे.