“त्या मुलाच्या त्रासामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली”; राष्ट्रवादी नेत्याच्या पत्नीचा मोठा खुलासा

Sonali Tanpure on Pune Car Accident| पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री पोर्शे कारने दुचाकीला धडक देत एक युवक आणि एक युवती अशा दोघांचा जीव घेतला. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा हा दारू पिऊन गाडी चालवत होता. वेदांत अग्रवाल असे अल्पवयीन आरोपीचे नाव आहे.
शनिवारी रात्री झालेल्या अपघातानंतर अवघ्या 15 तासांच्या आतमध्ये त्याचा सशर्त जामीन मंजुर झाल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. पोलीस आणि न्यायव्यवस्थेने घेतलेल्या भूमिकेनंतर सामान्य जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. यातच आता शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी या अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाविषयी मोठा खुलासा केला आहे.
बिल्डरच्या या मुलामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या मुलाला शाळा सोडावी लागली होती. सोनाली यांनी बिल्डरच्या मुलासह काही मुलांची तक्रार त्यांच्या पालकांकडे केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर मी माझ्या मुलाला त्या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत शिकवावे लागल्याचे सोनाली तनपुरे यांनी ट्वीट करत सांगितले आहे. सध्या त्यांच्या ट्वीटने एकच खळबळ उडाली असून आरोपी अल्पवयीन मुलाबाबत आता आणखी एक मोठा खुलासा झालेला आहे.
सोनाली तनपुरे ट्वीट
सोनाली तनपुरे यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंटनंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र, योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली.”
कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या…
संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती.
— Sonali Tanpure (@TanpureSonali) May 21, 2024
पुढे सोनाली यांनी लिहिले की, “त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा,” अशी मागणी सोनाली तनपुरे यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी घेतली माहिती
दरम्यान, पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघाताप्रकरणी गृहमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी पुणे पोलिस आयुक्तालयात भेट देवून या प्रकरणाची सर्व माहिती घेतली. आत्तापर्यंत याबाबत काय घडले, पुढे काय करणे गरजेचे आहे, अशा घटना घडू नयेत म्हणून काय उपायोजन करण्यात येतील याबाबत सविस्तर चर्चा केली.
दरम्यान, या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथून त्यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा:





