Valmik Karad surrendered to the CID : राजकीय द्वेषापोटी माझं नाव……; नेमकं काय म्हणाला वाल्मिक कराड ?

पुणेः बीड येथील मस्साजोगचे सरपचं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे राज्यात तीव्र स्वरुपाचे पडसाद उमटले होते. विधानसभेच्या अधिवेशनात देखील आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागमी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची चौकशी सीआयडी करेल, असे जाहीर केले होते. आता या प्रकरणात मोठी अपडेट आली असून , देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराडने सीआयडीला आत्मसमर्पन केले आहे. पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडीच्या कार्यालयासमोर कराडेने आत्मसमर्पन केले आहे. यामुळे आता या प्रकरणात चौकशीअंती कोणती माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. मात्र, कराडने राजकीय द्वेषापोटी या प्रकरणात आपले नाव गोवल्याचे सांगितले आहे.
या संपूर्ण प्रकरणावर शरणागती अगोदर कराडेने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडोओत त्याने केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली असल्याचे म्हणत मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना सीआयडी ऑफिस, पुणे पाषाण रोड येथे सरेंडर करीत असल्याचे सांगितले आहे. तसेच संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील, त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझे नाव जोडले जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो, तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार असल्याचे वाल्मिक कराडने म्हटले आहे.
२२ दिवसांनंतर शरणागती
वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी केली जात होती. देशमुख यांच्या हत्येला २२ दिवस पूर्ण झाले असून कराड आता सीआयडीला शरण गेला आहे. मात्र, तत्पूर्वी त्याने आपला या प्रकरणात सहभाग नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले अद्यापही फरार आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे.
सरकारचे अपयश
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंंद्र आव्हान यांची प्रतिक्रिया समोर आली असून सरकार आणि सीआयडीचे अपयश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तब्बल २२ दिवसांनंतर वाल्मिक कराड हा शरण आला, पोलीस आणि साआयडीला त्याचा शोध घेता न आल्याने सरकारचेही अपयश मानले जात असल्याचे त्यांनी सांगितले.





