Walmik Karad : वाल्मीक कराडला ‘अॅप्निया’ नावाचा आजार ; न्यायालयाकडे केली ‘ही’ मागणी

बीडः खंडणी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेला वाल्मीक कराड याला अॅप्निया नावाचा आजार आहे. या आजाराचे कारण पुढे करत कराडने न्यायालयाकडे आपल्याला २४ एक मदतनीस मिळावा, अशी मागणी केली आहे. वाल्मीक कराडची मंगळवारी रात्री वैद्यकीय पथकाने तपासणी केली होती. त्यावेळी कराडला श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार त्याने पोलिसांकडे केली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कारडने आपल्याला स्लीप अॅप्निया नावाचा आजार असल्याचा दावा केला आहे. या आजारामुळे कराडला श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे ऑक्सीजनसारखे मशीन त्याला दररोज लावले जाते. हेच मशिन चालवण्यासाठी सीआयडी कोठडीत आपल्याला 24 तास मदतनीस देण्याची विनंती कराडने न्यायालयाकडे केली. त्याच्या विनंतीनंतर केज जिल्हा व सत्र न्यायालयाने सीआयडीला शासकीय वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे सुचवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आरोप वाल्मीक कराडवर आहे. तर खंडणीच्या एका गुन्ह्यात कराडला अटक करण्यात आली आहे. तो पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण गेला. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला केज कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.





