पुणे – महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या हरकतींच्या सुनावणीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार हरकतींची सुनावणी वेळेत पूर्ण करण्यासाठी एकसारख्या हरकतींची सुनावणी वैयक्तिक स्वरूपात न घेता गटाने घेण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहे.
पुणे महापालिकेच्या प्रभागांसाठी 3 हजार 596 हरकती प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे सर्व हरकतींचे वर्गीकरण केले जाणार आहे. त्यानुसार सुनावणीचे नियोजन केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना 1 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली होती. त्यावर 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागविण्यात आल्या. सुनावणीसाठी आयोगाने “यशदा’चे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची नियुक्ती केली आहे. 24 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
तर 2 मार्चपर्यंत महापालिकेस हा सुनावणीचा अहवाल आयोगास पाठवायचा आहे. प्रत्येक हरकतीची स्वतंत्र सुनावणी घेतल्यास मुदतीत हे काम होणार नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया वेगाने पार पाडण्यासाठी एक प्रकारच्या अथवा काही विशिष्ट प्रभागांशी संबंधित विविध व्यक्तींकडून हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या आहेत. अशा हरकतदारांची मागणी एक प्रकारची असल्यास, त्या सर्व हरकतदारांचा एक गट करून सुनावणी घ्यावी असे आदेश आयोगाने दिले आहेत.