Gautam Gambhir : ‘प्रशिक्षक मित्र नको, तर वचक असणारा हवा!’ गौतम गंभीरच्या समर्थनार्थ माजी खेळाडू मैदानात
Gautam Gambhir : माजी खेळाडूच्या मते, जर गौतम गंभीरसारखा प्रशिक्षक पदावरून हटवला गेला, तर खेळाडूंना हाताळणे अशक्य होईल.

Munaf Patel Supports Gautam Gambhir : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने अलीकडेच टी-२० विश्वचषक, आशिया चषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे. मात्र, घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत झालेला पराभव आणि गंभीरची ‘स्ट्रेट फॉरवर्ड’ बोलण्याची पद्धत यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. अशातच २०११ च्या विश्वविजेत्या संघातील सदस्य मुनाफ पटेलने गंभीरची पाठराखण केली आहे.
“गंभीरला सत्य बोलण्याची सवय, जे अनेकांना आवडत नाही”
‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना मुनाफ म्हणाला, “लक्षात ठेवा, जर गौतम गंभीरसारखा प्रशिक्षक पदावरून हटवला गेला, तर खेळाडूंना हाताळणे अशक्य होईल. तो एक सच्चा माणूस आहे, जो सत्य समोर बोलतो आणि आजच्या काळात अनेकांना ते आवडत नाही. गंभीरला पैशांची हाव नाही, तो फक्त क्रिकेटवर प्रेम करतो. त्यामुळे तो कोणालाही घाबरत नाही.”
प्रशिक्षक हा ‘मित्र’ नसावा, तर ‘नियंत्रक’ असावा –
मुनाफच्या मते, संघात शिस्त टिकवून ठेवण्यासाठी गंभीरचा दरारा असणे आवश्यक आहे. “गंभीरकडे कोणत्याही बड्या खेळाडूला संघातून डच्चू देण्याची हिंमत आहे. प्रशिक्षक हा खेळाडूंचा मित्र असून चालत नाही, तर त्याचे संघावर पूर्ण नियंत्रण असायला हवे. जर प्रशिक्षक मित्र बनला, तर संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडेल. खेळाडूंमध्ये प्रशिक्षकाबद्दल आदरायुक्त भीती असणे गरजेचे आहे,” असे मत मुनाफने व्यक्त केले.
गंभीरच्या काळात भारताची कामगिरी –
गंभीरच्या कार्यकाळात भारतीय संघाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त यश मिळवले आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमधील काही निराशाजनक निकालांमुळे त्यांच्या कोचिंग स्टाईलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मुनाफने या टीकेला उत्तर देताना स्पष्ट केले की, गंभीरकडे संपूर्ण ‘कंट्रोलिंग सिस्टम’ असून तो खेळाडूंना शिस्त लावू शकतो.





