Mumbai Accident : भीषण अपघातात तरुण डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू, वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न
Mumbai Accident : मुंबई महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निवास यादव यांचा विक्रोळीत अपघाती मृत्यू झाला.

Mumbai Accident : मुंबई महानगरपालिकेतील तरुण पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निवास थंगवेलू यादव यांचा विक्रोळीतील भीषण अपघातात मृत्यू झाला. अवघ्या ३१ वर्षांच्या या उमद्या अधिकाऱ्याच्या निधनाने महापालिका वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. (Mumbai Accident )
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. यादव हे दुचाकीवरून जात असताना विक्रोळीच्या गांधीनगर जंक्शनजवळ मागून येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालय येथे नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Mumbai Accident )
डॉ. यादव हे मानखुर्द येथील देवनार पशुवधगृहात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत होते. वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता आणि त्यांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. मात्र, या अपघाताने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Mumbai Accident )
या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी टेम्पो चालक गोविंद राजकुमार गिरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. अपघातग्रस्त वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. (Mumbai Accident )





