पुणे – विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेली अभ्यास चळवळ आणि चांगला माणूस बनण्याचा संकल्प करूया, या उक्तीला अनुसरून तीन वर्षापूर्वी पुण्यातल्या कर्वे नगरच्या विकास चौकात संकल्प अभ्यासिकेची सुरवात करण्यात आली. पहिल्या वर्षापासूनचं त्या अभ्यासिकेला यशस्वी आणि गुणवान विद्यार्थ्यांची साथ लाभली. पहिल्या वर्षीच २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची विविध पदांवर नियुक्ती झाली. दुसऱ्या वर्षी हा आकडा ३० च्या वर गेला. आता तिसऱ्या वर्षीची अभ्यासिकेतील विद्यार्थांनी यशस्वीतेची परंपरा कायम ठेवली. यंदाही जवळपास १५ पेक्षा अधिक विद्यार्थी विविध पदांवर अधिकारी झालेत. नुकत्याच लागलेल्या सहाय्यक महसूल अधिकारी आणि सहाय्यक नगरविकास अधिकारी पदाच्या निकालात एकूण तीन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता दर्शक कामगिरी करत सरकारी अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. त्यामध्ये शाम नागणे, अजय भुगावकर आणि धनश्री तलवार यांचा समावेश आहे. सध्या पुण्यात अभ्यासकांचे प्रचंड पेव फुटले आहेत. कुठंही अभ्यासिका सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी घेऊनही अजिबात सुविधा दिल्या जात नाहीत. तीच बाब टाळण्यासाठी आपण ‘संकल्प’ची सुरवात केली आणि तीन वर्षापूर्वी आपण लावलेल्या एका छोट्या रोपट्याचा गुणी आणि अभ्यासू विद्यार्थी मित्रांमुळे वृक्ष तयार व्हायला लागला, अशी भावना अभ्यासिकेचे संचालक शशिकांत म्हारनूर यांनी दिली.