Sharad Pawar: ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती स्थिर, विश्रांतीचा सल्ला
Sharad Pawar: प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच मतदानापासून वंचित राहावे लागले. आज बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. १९६७ पासून आतापर्यंत कधीही मतदानाचा हक्क न चुकवणाऱ्या पवार यांनी स्वतः सोशल मीडियावरून याबद्दलची खंत व्यक्त केली.

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असून त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. नियमित वैद्यकीय तपासणीसाठी सोमवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आवश्यक त्या सर्व चाचण्यांचे अहवाल सकारात्मक आले असून, सध्या ते त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत.
वाढते वय आणि सततच्या दौऱ्यांमुळे आलेला थकवा लक्षात घेता, डॉक्टरांनी त्यांना काही दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचे तसेच प्रवास टाळण्याचे निर्देश दिले आहेत. पवार यांची प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सध्या निवासस्थानीच थांबणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना, पवार साहेबांचा राजकीय झंझावात महाराष्ट्राच्या पटलावर पुन्हा एकदा सक्रिय दिसावा, अशी भावना व्यक्त केली. त्यांच्या डिस्चार्जची बातमी मिळताच राज्यभरातील कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दुसरीकडे, प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच मतदानापासून वंचित राहावे लागले. आज बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. १९६७ पासून आतापर्यंत कधीही मतदानाचा हक्क न चुकवणाऱ्या पवार यांनी स्वतः सोशल मीडियावरून याबद्दलची खंत व्यक्त केली. प्रकृती बिघडल्याने आणि डॉक्टरांनी मुंबईबाहेर जाण्यास मनाई केल्याने नाईलाजास्तव बारामतीला जाता आले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी त्यांनी बारामतीकरांना सुनेत्रा पवार यांना मतदान करून दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहनही केले आहे.






