मुंबईत पावसाचा हाहाकार; विक्रोळीत दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू, कुटुंब उद्ध्वस्त

मुंबई : मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील पार्कसाईट परिसरात शनिवारी (16 ऑगस्ट) पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास भीषण दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात असलेल्या झोपडपट्टीवर ही आपत्ती कोसळली. या घटनेत मिश्रा कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरात डोंगरावर वसलेली झोपडपट्टी प्रत्येक पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या धोक्याखाली असते. यंदाही हवामान खात्याने दिलेल्या ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने माती भुसभुशीत झाली. शनिवारी पहाटे मिश्रा कुटुंबाच्या घरावर अचानक दरड कोसळली.
ढिगाऱ्याखाली त्यांचे घर पूर्णपणे गाडले गेले. या भीषण दुर्घटनेत सुरेश मिश्रा (वय 50) आणि त्यांची मुलगी शालू मिश्रा (वय 19) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुरेश यांच्या पत्नी आरती मिश्रा (वय 45) आणि मुलगा ऋतुराज मिश्रा (वय 20) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, महानगरपालिकेचे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखालून मिश्रा कुटुंबीयांना बाहेर काढण्यात यश आले, पण तोपर्यंत सुरेश आणि शालू यांचा मृत्यू झाला होता. बचावकार्य अद्याप सुरू असून, परिसरातील इतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम पालिकेकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
मुंबईत पावसाचा कहर कायम
हवामान खात्याने शनिवारी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पावसामुळे डोंगराळ भागातील माती आणखी निसरडी होण्याची भीती आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने खबरदारी म्हणून आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. तसेच, आणखी दुर्घटना टाळण्यासाठी संरक्षक भिंती आणि इतर उपाययोजनांवर भर दिला जात आहे.





