अक्खा महाराष्ट्र सुन्न…! लोकलमध्येच प्राध्यापकाला संपवलं; क्षुल्लक वादातून भरगर्दीत रक्ताचा सडा
Malad Murder case : महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकाची चाकुने हल्ला करून हत्या

Malad Murder case : मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी आलोक सिंह (3१) या महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकाची चाकुने हल्ला करून हत्या करण्यात आली आहे. लोकलमधून उतरताना झालेल्या एका क्षुल्लक वादात ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपी ओंकार शिंदे (27) याला अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मालाड रेल्वे स्थानकात उतरत असताना अलोक सिंह यांचा गर्दीमुळे दुसऱ्या एका प्रवाशाला धक्का लागला. यावरुन दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. मात्र, रागाच्या भरात असलेल्या आरोपी ओंकार शिंदेने अलोक सिंग यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यांना तातडीने रुग्णालयात हालवण्यात आले.
फरार आरोपीला अटक
मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. हल्ल्यानंतर आरोपी ओंकार शिंदे गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला होता. स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना आरोपीची ओळख पटवत, आरोपीचा मागोवा घेत त्याला अटक केली आहे. ओंकार शिंदे याला बोरिवली येथील रेल्वे पोलिसांच्या मुख्यालयात आणले असून त्याची चौकशी सुरु आहे.
कोण होते आलोक सिंह?
प्रा. आलोक सिंह हे विलेपार्ले येथील नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये गणिताचे प्राध्यापक होते. 2024 पासून नरसी मोंजी कॉलेजमध्ये ते कार्यरत होते. मयत आलोक सिंह याचे वडील संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या सुरक्षेमध्ये कमांडो म्हणून तैनात होते.

महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकाची चाकुने हल्ला करून हत्या
त्यांनी अनेक वर्षे राजनाथ सिंह यांचे सुरक्षारक्षक म्हणून काम केले आहे. आलोक सिंह आणि ओंकार शिंदे हे दोघेही मालाड परिसरातच रहायला होते. त्यामुळे आरोपी ओंकार शिंदे आणि आलोक सिंह यांच्यात जुना वाद होता का? याचाही बोरिवली जीआरपी पोलीस तपास करत आहेत.
डोळ्यात पाणी, कंठ दाटला! नातेवाईक हतबल
आलोक सिंग यांच्या हत्येचं वृत्त ऐकून त्यांचे मित्र मंडळी आणि नातेवाईकही सुन्न झाले आहेत. त्यांच्या तोंडून शब्दही फुटेनासा झाला आहे. काय बोलावं? तेच कळत नाही. कंठ दाटून गेलाय, शब्द फुटत नाही, फक्त डोळ्यात पाणी आहे… अशी अवस्था या नातेवाईकांची झाली आहे.
या नातेवाईकाने तर पोलिसांवरच संताप व्यक्त केला आहे. आलोक सिंग हा अत्यंत साधा माणूस होता. आलोक मितभाषी होते. कधीच कुणाशी भांडले नाही. ते. सर्वांशी प्रेमाने वागायचे. त्यांचं कुणाशी भांडण होऊच कसं शकतं? असा सवाल या नातेवाईकाने केला आहे.




