Mulshi Water Scheme: मुळशीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक; ‘या’ गावांना मिळणार वाढीव पाणी
Mulshi Water Scheme: मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा टप्पा-१ आणि २ च्या आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पावसाळी अधिवेशनात होणार विशेष बैठक.

Mulshi Water Scheme – चालू पावसाळी अधिवेशन काळात मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा टप्पा – १ आणि टप्पा – २ योजनेच्या पाणी आरक्षण संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित केली जाईल. हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील नागरिकांना एमआयडीसीच्या माध्यमातून वाढीव पाणी दिले जाणार असल्याची माहिती आमदार शंकर मांडेकर यांनी दिली. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योग मंत्री उदय सामंत,
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत भोर – राजगड – मुळशी मतदारसंघातील विविध प्रलंबित विकास कामांच्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक मुंबई येथे विधान भवनात पार पडली. यावेळी आमदार शंकर मांडेकर यांनी पौड, भोर, राजगड या तीनही ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणी वर्धन चे प्रस्ताव शासन स्तरावर आले असून मतदारसंघातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी श्रेणी वर्धनची मागणी तसेच निगुडघर ( ता. भोर ) येथे विशेष बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे म्हणून मागणी केली असता,
सदर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. चांदणी चौक – पौड – ताम्हिणी या रस्त्यावर होणाऱ्या अपघातग्रस्तांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी पिरंगुट ( ता. मुळशी) येथे ट्रामा केअर सेंटरला मंजुरी देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बैठकीत सांगितले हिंजवडी, पिरंगुट आणि माण परिसरातील घनकचरा व्यवस्थापन,
भूसंपादनाचा प्रश्न आणि स्थानिक पोलीस स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतचे विषय तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. तसेच हिंजवडी आयटी पार्क परिसरात स्थानिक भूमिपुत्रांना व तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक पातळीवर एक विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतला.
उरवडे, पिरंगुट (ता. मुळशी) आणि वेळू, शिंदेवाडी (ता. भोर) येथील औद्योगिक वसाहतींमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी भरीव निधी दिला जाईल. तसेच भोर एमआयडीसीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितल्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले. या बैठकीला पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे, ग्राम विकास सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव प्रराग जैन नानुटीया, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव अमगोथू रंगा नाईक,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रधान सचिव राजेश देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (आँनलाईन द्वारे), मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता वैशाली आवटे, एमआयडीसी मुख्य अभियंता कालिदास भांडेकर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे आरोग्य उपसंचालक भगवान पवार यांच्यासह ग्रामीण विकास, उद्योग, आरोग्य, पाणी पुरवठा, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





