Pune Water Supply : पुणेकर मुळशीच्या पाण्यापासून दूरच ! तीन यंत्रणांच्या उदासीनतेमुळे प्रस्ताव रखडला
Pune Water Supply : उन्हाळ्यातील पाणी कपात टाळणे, समाविष्ट गावांना पुरेसा पुरवठा आणि खडकवासला प्रकल्पावरील ताण कमी करण्यासाठी महत्त्वाची योजना; मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे निर्णय लांबणीवर.

Pune Water Supply – मुळशी धरणातून पुणे शहराला सात टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव अंतिम मान्येतच्या प्रतिक्षेत आहे. पुणे, पिंपरी -चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडून पाणी नियोजनाचा आराखडा अजूनही जलसंपदा विभागाला मिळाला नाही. या तिन्ही संस्थांच्या उदासिनतेमुळे मुळशी धरणातून पाणी मिळण्याच्या प्रकियेस अपेक्षित गती मिळत नसल्याचे चित्र आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुळशी धरणातून शहराला पाणी देण्याबाबत आग्रही होते. वीज निर्मितीसाठी अनेक साधने असता धरणातील पाणी हे पिण्यासाठी आणि शेतीसाठी मिळावे, अशी त्यांची भूमिका होती. मुळशी धरणातून वाया जाणारे पाणी बिगर सिंचनासाठी वापरता येईल, असा एक पर्याय पुढे आला होता. त्यानुसार मुळशी धरणातून वाया जाणाऱ्या सात टीएमसी पाण्याच्या वापरास जलसंपदा विभागाने मान्यता दिली. याचा सविस्तर प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाने राज्य सरकारला पाठवला आहे.
या प्रस्तावाला राज्य सरकारने तसेच टाटा कंपनीने तत्त्वतः मान्यता दिली आहे. हे पाणी नेमकी कधी, कसे व कोठे वापरायचे या संदर्भात अभ्यास गट स्थापन करावा, अशा सूचना जलसंपदा राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार टाटा कंपनी आणि जलसंपदा विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा एक अभ्यास गट तयार केला असून याबाबत शास्त्रीय अभ्यास सुरू आहे. पुणे, पिंपरी महापालिका, पीएमआरडीएने किती पाणी लागेल याचा आराखडा जलसंपदा विभागाला देणे गरजेचे आहे. त्यानंतरच सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला जाणार आहे.
या प्रकल्पासाठीचा हा तिन्ही संस्थांच्या पाणीवाटपावर ठरणार आहे. मात्र, या तिन्ही संस्थांचा प्रतिसाद मिळत नसल्याने जलसंपदा विभागापुढे काय करावे असा प्रश्न आहे.पुणे शहराच्या वाढत्या नागरीकरणामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढलेली आहे. सध्या पुणे शहराला खडकवासला प्रकल्प, म्हणजे खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांतून पाणीपुरवठा होतो.
खडकवासला धरणातून दौंड, इंदापूर आणि हवेली तालुक्यांमधील शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात येते. काही वर्षांपूर्वी भामा आसखेड धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र वाढत्या नागरीकरणामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी सतत वाढत आहे. त्यामुळे पुढील २० वर्षांचा विचार करून मुळशी धरणातून पाणी देण्याच्या मागणीवर गांभीर्याने विचार सुरु आहे.
मान्येतेचे फायदे
– उन्हाळ्यातील पाणी कपात थांबणार
– समाविष्ट गावे, उपनगरांना पुरेसे पाणी
– खडकवासला प्रकल्पावरील ताण कमी होणार






