Paud News : मुळशीत अतिवृष्टीचा फटका; शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, तहसीलदार विजयकुमार चोबे यांचे आदेश
Paud News : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Paud News : मुळशी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी महसूल यंत्रणेला तातडीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. (Paud News)
अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खरीप पिके पाण्याखाली गेली असून, शेतीची सुपीक माती वाहून जाणे, शेतबांध खचणे तसेच इतर शेतीसंबंधित नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. या सर्व नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेऊन शासनाच्या नियमानुसार पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी व कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत. (Paud News)
तहसीलदारांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागांना तातडीने भेटी देऊन पंचनाम्याचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंचनाम्यांच्या आधारे पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत व नुकसानभरपाईची प्रक्रिया गतीने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Paud News)
मुळशीतील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी मुळशी तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सचिन खैरे व पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आली होती. (Paud News)

दरम्यान, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, कृषी सहाय्यक किंवा महसूल कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या नुकसानीची माहिती तातडीने नोंदवावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Paud News)





