Mulshi Rain: मुळशीत पावसाच्या आगमनाने निसर्ग खुलला; निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी
Mulshi Rain: कोळवण खोऱ्यातील वळकी नदीला पूर, मुळशीचे धबधबे झाले प्रवाहित; रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक मुळशीकडे रवाना.

Mulshi Rain – मुळशी तालुक्यात रविवारी (दि. ५) पावसाने दमदार हजेरी लावली. तालुक्यात सर्वत्र मुसळधार सरी कोसळल्या. या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून ओढे, नाले आणि नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, निसर्गरम्य मुळशीचे सौंदर्य खुलल्याने पर्यटकांनीही मोठ्या संख्येने तालुक्याकडे धाव घेतली.
कोळवण खोऱ्यातील वळकी नदी दुथडी भरून वाहत असून परिसरातील धबधबेही प्रवाहित झाले आहेत. पावसाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटकांनी मुळशीतील विविध पर्यटनस्थळांवर गर्दी केली. काही पर्यटक रस्त्यालगत वाहन उभे करत पावसाचा आनंद घेत असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना सावधगिरीने वाहने चालवावी लागत आहेत. दरम्यान, पौड–पिरंगुट मार्ग, घोटवडे फाटा आणि भुगाव परिसरात पर्यटकांच्या वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली.
परिणामी स्थानिक नागरिकांसह नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, पावसाचा आनंद घेताना पर्यटकांनी सुरक्षिततेचे भान राखावे, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे. मुळशीत भात पिकाची काही ठिकाणी नुकतीच पेरणी केली होती. तरी, काही ठिकाणी छोटे रोप तयार झाले होते. अशातच जोरदार पाऊस लागून राहिल्यास पावसामुळे अनेक रोपे खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.





