Shankar Mandekar – पावसाळ्यापूर्वी हिंजवडी-माण-भूगाव-पिरंगुट परिसरातील विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित करण्याची मागणी भोर-मुळशी-राजगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे केली. या संदर्भात आमदार मांडेकर यांनी आज पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. चौधरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्ते कामे व प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी मुख्य अभियंता रिनाज पठाण, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, नगररचना अधिकारी अस्मिता कलकुटकी तसेच वन अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते. बैठकीत पावसाळ्यापूर्वी हिंजवडी-माण परिसराचा पाहणी दौरा करण्यास आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले. यावेळी घोटावडे फाटा येथील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भुयारी मार्ग उभारणी, भूगाव बायपास रस्त्याचे भूसंपादन, मारुंजी रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्यासाठी निधी तरतूद, प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रलंबित प्रश्न, तसेच नांदे (ता. मुळशी) येथील चौक सुधारणा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय नदी सुधार प्रकल्प लवकर मार्गी लावण्याबाबतही संबंधित अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आमदार मांडेकर यांनी दिली.