Pimpri News | १२,५०० हेक्टरवरील भातपिकाला धोका,उत्पादनात ३०% घट होण्याचा शक्यता ; शेतकरी चिंतेत

प्रभात वृत्तसेवा
पवन मावळ – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा भातशेतीसाठी प्रसिद्ध असून भाताचा कोठार म्हणून ओळखला जातो. तालुक्यात तब्बल १२,५०० हेक्टरवर भात लागवड केली जाते. यातून ९० टक्के क्षेत्रावर इंद्रायणी वाण घेतले जाते. यावर्षी पावसाचे समाधानकारक प्रमाण असल्याने शेतकरी खुश होते. परंतु गेल्या आठवड्यात अचानक भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. करपाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने आता कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी थेट बाधित क्षेत्रातील शेतबांधांवर धाव घेतली असून उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.
करपा रोगामुळे भातपिकाची पाने कोरडी पडतात आणि धान्यावर या स्थितीचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे उत्पादनात २० ते ३० टक्के घट होण्याचा धोका निर्माण होतो. तालुक्यातील करुंज, बेडसे, येळसे, कामशेत, वडगाव आदी भागात करपा बाधित शेतांचे प्रमाण वाढत असून शेतकरी उत्पादन घटण्याच्या भीतीने चिंताग्रस्त आहेत.कामगंध सापळे बसवून आठवड्यातून दोन वेळा कीड व रोगाची तपासणी केली जात आहे. सर्व क्षेत्रीय सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि उपकृषी अधिकारी यांना बाधित क्षेत्रात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गावांमध्ये विशेष जागृती मोहीम राबवली जात आहे.
कृषी विभागाची तातडीची धावपळ..
शेतकऱ्यांची भीती दूर करण्यासाठी पुण्याच्या कृषी विभागाने त्वरित पावले उचलली आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी सुनिलकुमार जाधव यांनी मावळ तालुक्यात दौरा करत प्रत्यक्ष करपा बाधित प्लॉटची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून रोग नियंत्रणाच्या उपाययोजना सांगितल्या. करपा रोग नियंत्रणात आणण्यासाठी फवारणी करणे अत्यावश्यक आहे. शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता कृषी विभागाशी संपर्क साधावा. आम्ही गावोगावी जाऊन मार्गदर्शन करीत आहोत. व्हॉट्सऍप ग्रुप, वार्ताफलक, शेतीशाळा यामधून सुद्धा माहिती पोहचवली जात आहे. असे जाधव यांनी सांगितले
शेतकऱ्यांसाठी शिफारस केलेल्या उपाययोजना..
कॉपर ऑक्सिक्लोराइड (२५ ग्रॅम) किंवा कार्बेन्डाझिम (१० ग्रॅम) किंवा ट्रायसायक्लोझोल (६ ग्रॅम) किंवा मॅन्कोझेब (२५ ग्रॅम) यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक वापरावे. या बुरशीनाशकांसोबत स्ट्रेप्टोसायक्लीन (१.५ ग्रॅम), स्टिकर (२० मिली) ही तिन्ही औषधे १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी. १५ दिवसांच्या अंतराने किमान २ ते ३ वेळा फवारणी करणे गरजेचे आहे.
“शेतकऱ्यांनी करपा रोग दिसताच विलंब न करता औषध फवारणी सुरू करावी. योग्य वेळी केलेली फवारणीच रोग नियंत्रणासाठी प्रभावी ठरते. उत्पादन घटू नये म्हणून कृषी विभागाशी सातत्याने संपर्क ठेवा.”
– सुनिलकुमार जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी, पुणे





