Fire News: पौड – मुळशी तालुक्यातील मौजे भालगुडी येथील लव्हाळवाडी परिसरात बुधवारी भीषण आग लागून सुमारे आठ घरे जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग वेगाने पसरल्याने काही वेळातच अनेक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. घटनास्थळी मुळशी आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमोद बलकवडे, तहसीलदार विजयकुमार चोबे, सभापती मंदा शेळके, पंचायत समिती सदस्य प्रवीण धनवे, तलाठी, कोतवाल तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल भामे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.