Mulshi News – मुळशी पंचायत समितीच्या सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याचे गुपित अद्याप कायम आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने सोमवारी (दि. ९) होणाऱ्या निवडणुकीत राजकीय समीकरणांची मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एकत्र येणार, की भाजपसोबत एखादी ‘अनोखी’ युती उभी राहणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. मुळशी पंचायत समितीच्या एकूण सहा जागा आहे. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रवीण धनवे, काजल मोरे आणि मंदा शेळके हे तीन उमेदवार निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे दगडू करंजावणे आणि राहुल पवळे हे दोघे निवडून आले. भाजपकडून ऐश्वर्या वाघमारे ह्या एकमेव निवडून आल्या. बहुमतासाठी चार सदस्यांचे पाठबळ महत्त्वाचे असून सध्यातरी कोणत्याही पक्षाकडे बहुमताचा आकडा नाही. दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आल्यास सदस्यांची संख्या ५ वर पोहोचते. सभापतीपद ‘सर्वसाधारण महिला’ वर्गासाठी असल्याने काजल मोरे आणि मंदा शेळके या अडीच वर्षांचा कार्यकाळ विभागून घेऊ शकतात. तर उपसभापती पदासाठी दगडू करंजावणे, प्रवीण धनवे आणि राहुल पवळे यांच्यात फेरबदल होऊ शकतो, अशी राजकीय वर्तूळात चर्चा आहे. जर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) आणि भाजप एकत्र आले, तर दोन्ही बाजूंचे संख्याबळ ३-३ असे समान होईल. अशा स्थितीत चिठ्ठी किंवा इतर राजकीय डावपेचांवर निकाल अवलंबून असेल. निर्णायक भूमिकेत आमदार मांडेकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काजल मोरे आणि मंदा शेळके या दोन्ही महिला सदस्यांमध्ये सभापती पदासाठी चुरस निर्माण झाली आहे. यावर अंतिम मोहोर आमदार शंकर मांडेकर उमटवणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे. तूर्तास तरी सभापतीपदी कोण विराजमान होणार हे अद्यापही निश्चित नाही.