Mulshi News: मित्रांच्या तत्परतेमुळे वाचले शेतकर्याचे प्राण! कोळवण प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांवर प्रश्नचिन्ह
Mulshi News: कोळवण येथील शेतकरी सचिन धिडे यांना शेतात सर्पदंश; प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा नसल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात करावे लागले दाखल.

Mulshi News – मुळशी तालुक्यातील कोळवण येथील शेतकरी सचिन तुकाराम धिडे यांना शेतात काम करत असताना सर्पदंश झाल्याने उपचारांसाठी मोठी धावपळ करावी लागली. मित्र व नातेवाईकांच्या तत्परतेमुळे त्यांच्यावर वेळेत उपचार होऊन त्यांचे प्राण वाचले. मात्र, या घटनेनंतर कोळवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सचिन धिडे शेतात काम करत असताना त्यांना सर्पदंश झाला.
ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने कोळवण येथील शासकीय दवाखान्यात दाखल केले. मात्र, तेथे आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले. प्राथमिक उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नव्हते. तसेच सर्पदंश झालेल्या जागेवर बांधलेली पट्टी कापण्यासाठी साधी कात्रीही उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर धिडे यांना पुढील उपचारासाठी पौड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णवाहिकेतून पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान त्यांना सलग दहा प्रतिविष (अँटी-स्नेक व्हेनम) इंजेक्शने देण्यात आली. त्यामुळे शरीरातील विषाचा प्रभाव कमी झाला असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्यांच्या पायावरील सूज अद्याप कायम असल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण घटनेत मित्र व नातेवाईकांनी केलेल्या तातडीच्या मदतीमुळे धिडे यांना वेळेत उपचार मिळाले. मात्र, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचा अभाव चिंताजनक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
माजी पंचायत समिती सदस्य सचिन साठे आणि उद्योजक नितीन साठे यांनी सांगितले की, सर्पदंशासारख्या आपत्कालीन परिस्थितीत प्राथमिक उपचार तातडीने उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. कोळवण प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सुविधा त्वरित सक्षम करून आवश्यक मनुष्यबळ, औषधे व साहित्य उपलब्ध करून द्यावे. अन्यथा भविष्यात अशा घटनांमध्ये जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.





