Pune Crime: “मीच त्याचा खून केलाय!” मित्राला रक्ताच्या थारोळ्यात पाडून आरोपी थेट पोलीस ठाण्यात हजर
Pune Crime: भवानी पेठेतील काशेवाडी परिसरात नशा करताना झालेल्या क्षुल्लक वादातून ३० वर्षीय तरूणाची सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून निर्घृण हत्या.

Pune Crime- नशा करताना झालेल्या वादातून एकाने मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून केल्याची घटना भवानी पेठेतील काशेवाडी भागात घडली. खून केल्यानंतर आरोपी स्वत:हून खडक पोलीस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. आकाश ऊर्फ अक्क्या ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे (३०, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अजय ऊर्फ चोर राजा सुखदेव शिंदे (३०, रा. काशेवाडी, भवानी पेठ) याला अटक करण्यात आली.
याबाबत रुपाली प्रमोद पाटोळे (३०) हिने खडक पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली पाटोळे या भवानी पेठेतील जुना मोटार स्टँड परिसरात शेंगा, कणीस विक्रीची गाडी लावतात. शुक्रवारी (२ ऑक्टोबर) सायंकाळी रुपालीचा दीर आकाश घरी झोपला होता. सायंकाळी तो झोपेतून उठला. आंघोळ करून तो घरात बसला होता. त्या वेळी त्याचे मित्र शंभू आणि अबिद घरी आले. दोघांसोबत तो बाहेर पडला.
रात्री साडेआठच्या सुमारास आकाश हा काशेवाडी परिसरातील वजनकाट्याजवळ असलेल्या एका सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. काशेवाडी परिसरात राहणाऱ्या एकाने याबाबतची माहिती रुपाली यांना दिली. त्यानंतर रुपाली तेथे गेल्या. तेव्हा आकाश रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्यांनी पाहिले. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
त्यानंतर रुपाली या घटनेची माहिती देण्यासाठी खडक पोलीस ठाण्यात गेल्या. तेव्हा आकाशचा मित्र अजय ऊर्फ चोर राजा पोलीस ठाण्यात आला होता. त्याने नशा करताना झालेल्या वादातून आकाशच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. खून केल्यानंतर तो घरी गेला. कपडे बदलून तो पोलीस ठाण्यात आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव तपास करत आहेत.





