Mulshi Accident – लवळेफाटा (ता. मुळशी) येथे आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. भरधाव वेगातील आयशर ट्रकने दुचाकीस्वाराला जवळपास 200 फूट फरपटत नेल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बावधन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास चांदणी चौकाकडून पिरंगुटकडे येणार्या आयशर ट्रक (एमएच 13 सीयू 6196) चालक निळकंठ बाबुराव घंटे (वय 42, रा. माळेगाव, ता. निलंगा, जि. लातूर) हा भरधाव वेगाने वाहन चालवत होता. लवळेफाटा चौकात आल्यानंतर त्याने ऑटो रिक्षा (एमएच 12 एसके 9985), टोयोटा हाय रायडर चारचाकी (एमएच 09 जीझेड 7908) तसेच दुचाकी (एमएच 13 एई 9210) यांना जोरदार धडक दिली.या अपघातात रिक्षा, चारचाकी आणि दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुचाकीवर मागे बसलेले विक्रम चौधरी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ सिम्बॉयसिस हॉस्पिटल, लवळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली बावधन पोलीस अधिक तपास करीत आहेत.