MSRTC News: लालपरी’ला चांगले दिवस कधी येणार? आयुर्मर्यादा संपलेल्या बसेस रस्त्यावर; प्रवाशांचा जीव टांगणीला
MSRTC News: इंजिनमधील खडखडाट, गिअर बॉक्समधील बिघाड अन् खराब टायर; मुदत संपलेल्या गाड्या चालवणे चालकांसाठीही धोक्याचे.

MSRTC News – सध्याच्या काळात ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठे बदल झाले असून नवनवीन मॉडेलच्या गाड्या रस्त्यावर धावताना दिसत आहेत. मात्र, सामान्यांची वाहिनी असलेली आपली ‘लालपरी’ अजूनही जुनाट अवस्थेतच आहे. इंदापूर-बारामती मार्गावर दर दोन-तीन दिवसांनी कुठे ना कुठे इंजिनमध्ये बिघाड होऊन किंवा गियर-टायर खराब झाल्याने एसटी बस बंद पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यामुळे “एसटीला नक्की चांगले दिवस कधी येणार?” असा उद्विग्न सवाल प्रवासी करत आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी असलेल्या विविध सवलतींमुळे एसटीमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच, मालवाहतूक (पार्सल सेवा) असो वा निवडणुकीच्या कामासाठी ईव्हीएम मशीनची ने-आण असो, एसटी महामंडळाचे योगदान मोलाचे राहिले आहे.

भवानीनगर : इंदापूर-बारामती मार्गावर इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला बंद पडलेली एसटी बस.
बाजारात खासगी गाड्यांचे पर्याय उपलब्ध असूनही ग्रामीण भागातील नागरिक सुरक्षित आणि विश्वासू प्रवास म्हणून एसटीलाच पसंती देतात. मात्र, सध्या अनेक मार्गांवर धावणाऱ्या बसेसची आयुर्मर्यादा संपलेली आहे. चालकांशी संवाद साधला असता, गिअर बॉक्समधील बिघाड, इंजिनमधील खडखडाट आणि गुळगुळीत झालेले टायर यामुळे प्रवास धोक्याचा होत असल्याचे ते सांगतात.
आयुष्य संपलेल्या या बसेस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे, तसेच ऐन वेळी गाडी बंद पडल्याने वेळेचा अपव्यय होत आहे. एसटी महामंडळाने व शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जुन्या बसेस तत्काळ सेवेतून हटवाव्यात, अशी मागणी होत आहे.
सुखाचा प्रवास व्हावा; नागरिकांची मागणी
महामंडळाने अद्ययावत तंत्रज्ञानाच्या नवीन बसेस ताफ्यात समाविष्ट केल्यास प्रवाशांचा प्रवास सुखाचा व आरामदायी होईल. शिवाय, प्रवाशांची संख्या वाढून शासनाच्या महसुलातही मोठी भर पडेल. त्यामुळे एसटीच्या “एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास” या ब्रीदवाक्याला साजेसा कारभार करावा आणि प्रवाशांना चांगल्या बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे.





