Pune MSRTC: मद्यधुंद कर्मचाऱ्यांना एसटीचा मोठा दणका! ८ महिन्यांत १० निलंबित, ४ चालकांची नोकरी धोक्यात
Pune MSRTC: पुणे एसटी विभागाकडून मागील आठ महिन्यांत ७ चालक आणि ३ वाहकांवर निलंबनाची कारवाई; कर्मचारी वर्गात मोठी खळबळ.

Pune MSRTC – कर्तव्य बजावताना मद्यपान करणाऱ्या आणि बेजबाबदारपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध पुणे एसटी प्रशासनाकडून कडक कारवाईचा बडगा उगारला असून, मागील आठ महिन्यांत पुणे विभागातील तब्बल १० कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यातील चार कर्मचाऱ्यांना बडतर्फ का करू नये, अशी नोटीस बजावली आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी वर्गात खळबळ उडाली असून, बेजबाबदार आणि बेशिस्त कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
एसटीचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित म्हणून दररोज लाखो प्रवासी एसटी बसमधून प्रवास करीत असतात. प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचवणे हे एसटी महामंडळाचे कर्तव्य आहे, असे असताना मद्यधुंद अवस्थेत बस चालवणे किंवा कर्तव्यावर हजर असताना मद्यपान हा प्रवाशांच्या मृत्यूला आमंत्रण देणारा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे पुणे एसटी विभागाकडून १० दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून,
त्यामध्ये सात चालक आणि तीन वाहकांचा समावेश आहे. दरम्यान, या १० प्रकरणांपैकी काही प्रकरणे इतकी गंभीर आणि प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण करणारी होती की, प्रशासनाने चार चालकांना थेट तुम्हाला सेवेतून बडतर्फ का करू नये? अशा कडक आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिसीला कायदेशीर आणि समाधानकारक उत्तर न मिळाल्यास, या चारही चालकांना त्यांची नोकरी गमवावी लागणार आहे.
“प्रवाशांच्या सुरक्षेशी कधीही तडजोड केली जाणार नाही. त्यामुळे मद्यपान करून कर्तव्यावर आलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई केली जाईल.”
– कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे विभाग




