Ajit Pawar Jayanti: “दादा आजही आपल्यातच आहेत..” स्व. अजितदादांच्या पहिल्या जयंतीला काटेवाडीत डोळे पाणावले
Ajit Pawar Jayanti: स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रथमच शासकीय जयंती साजरी; मूळगाव काटेवाडीत ग्रामस्थांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली.

Ajit Pawar Jayanti – ज्या काटेवाडीत स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस दरवर्षी उत्साहात साजरा होत असे, त्याच मूळगावी यंदा त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. शासनाने त्यांच्या जयंतीला शासकीय मान्यता दिल्यानंतर प्रथमच काटेवाडीसह राज्यभर हा दिवस शासकीय जयंती म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांच्या भावना अनावर झाल्या असून, दादा आजही आपल्यातच आहेत, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
काटेवाडी (ता. बारामती) येथील ग्रामपंचायत कार्यालयात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रशांत काटे, संचालक अनिल काटे, माजी संचालक संजय काटे, सरपंच मंदाकिनी भिसे, उपसरपंच मिलिंद काटे, माजी सरपंच विद्याधर काटे, राजेंद्र पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य के. टी. जाधव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय काटे, भारत जाधव,
अजित काटे, सुजित नरूटे, श्रीधर घुले, आनंद मोरे, सागर भिसे, शितल काटे, अजित गरदडे, सतीश देशमुख, धीरज घुले, महिला सदस्या तसेच ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा, जनसेवेच्या ध्यासाचा आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याचा स्मरणपूर्वक उल्लेख केला.
विकास, लोककल्याण आणि सर्वसामान्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख कायम स्मरणात राहील, असे वक्त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी नव्या पिढीने अजितदादांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी अजितदादा अमर रहे या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मात्र, या घोषणांबरोबरच अनेकांचे डोळे पाणावले आणि उपस्थित वातावरण भावुक झाले.





