MSRTC News : उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची चांदी! पुणे विभागातून धावणार ४५० जादा एसटी गाड्या; ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात
MSRTC News : खासगी बसचे दर गगनाला भिडले असताना एसटी ठरतेय आधार; स्वारगेट, पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर आगारातून सुटणार जादा फेऱ्या.

MSRTC News – नोकरी, शिक्षण, व्यावसायानिमित्त पुण्यात स्थायिक असलेले कुटुंब शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या सुरू होताच गावी जाण्यासाठी एसटी स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होते. साधारणतः १२ ते १५ एप्रिलनंतर ही गर्दी वाढते. त्यामुळे पुणे एसटी विभागाकडून यंदाही १५ एप्रिलपासून कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, परभणी, धाराशिव आणि कोकणासह राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ४५० जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे.
येत्या १५ एप्रिल ते १५ जूनदरम्यान या जादा बस धावणार असून, त्यामध्ये स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, पिंपरी-चिंचवड या प्रमुख स्थानकासह जिल्ह्याच्या तालुक्यातील स्थानकातूनही जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उन्हाळी सुट्टी सुरू होताच अनेक कुटुंबाकडून मूळ गावी जाण्याचे नियोजन होते. तर काही कुटुंब पर्यटनासाठी बाहेरगावी जातात.
त्यामुळे एप्रिल, मे महिन्यातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता काही प्रवाशांकडून काही महिने अधीच रेल्वे, एसटी यांसह खासगी बसचे सीट आरक्षित केले जाते. त्यामुळे सुट्या सुरू होण्याअधीच रेल्वेचे बुकिंग फुल्ल झालेले असते. त्यावेळी एसटी किंवा खासगी बसशिवाय पर्याय उरत नाही. एसटी बसचा प्रवास सुरक्षित आणि नवीन बस ताफ्यात दाखल झाल्यामुळे प्रवास आरामदायी झाला आहे.
त्यामुळे ज्या कुटुंबीयांचे नोकरीच्या ठिकाणी सुट्या किंवा अन्य कारणांमुळे चार ते आठ दिवस आधी बाहेरगावी जायचे नियोजन होते. अशा प्रवाशांना एसटीशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे सुट्टी सुरू होताच स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होते. त्यामुळे प्रवाशांना अडचणी येऊ नये, तत्काळ बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पुणे एसटी विभागाकडून दि. १५ एप्रिल ते १५ जूनदरम्यान जादा बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
दरवर्षी १२ ते १४ एप्रिलपर्यंत शाळांच्या परीक्षा संपतात. त्यानंतर कुटुंबीयांकडून बाहेरगावी जाण्याचे नियोजन होते. त्यामुळे १५ एप्रिलपासून स्थानकावर गर्दी होते. मात्र, यंदा परीक्षांचे वेळापत्रक पुढे गेल्यामुळे काही शाळा २५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गर्दी २५ एप्रिलनंतर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीनुसार जादा बस सोडण्यात येणार आहे. नियमित बससह जादा बस आगारातून सोडण्यात येणार आहे.
या आगारातून सुटतील बस :
– स्वारगेट आगार : बोरिवली, ठाणे, दादर, सोलापूर, कोल्हापूर, कल्याण, पंढरपूर
– पुणे स्टेशन आगार : दादर, मुंबई
– शिवाजीनगर आगार : छत्रपती संभाजीनगर, नाशिक, लातूर, धुळे, अकोला, सोलापूर, भीमाशंकर, बोरिवली
“प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागातून जादा बस सोडण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी वाहनातून प्रवास करण्यापेक्षा सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांनी एसटीचा लाभ घ्यावा.”
– अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे






