Pune : पंढरपूरसाठी पुणे विभागातून ७५० बस

पुणे : आषाढी वारी लाडक्या पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठी भाविकांची पुणे विभागातील मुख्य एसटी बसस्थानकासह जिल्ह्यातील सर्व स्थानकात गर्दी होते. यंदा ही गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे एसटी विभागाने पुण्यातून पंढरपुरसाठी साडेसातशे गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.
महिला प्रवाशी सवलत, ज्येष्ठ नागरिकांना सवलत आणि ७५ वर्षे पुढील प्रवाशांना मोफत सेवा दिली जात असल्यामुळे एसटीला अधीच गर्दी वाढली आहे. त्यात आषाढी वारी म्हटल्यावर पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या तर दुपटीने वाढणार. त्यामुळे पुणे विभागातील १४ आगारातून पंढरपूरसाठी गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले. ६ जुलै रोजी आषाढी यात्रा असल्यामुळे अगोदर काही दिवसांपासून गाड्या सोडण्यात येणार आहे.
त्यासाठी एसटीच्या पुणे विभागाने एकूण साडेसातशे बस सोडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यापैकी साडेतीनशे बस या पुणे विभागाच्या असणार आहेत. तर, इतर तीनशे बस या वेगवेगळ्या विभागातून मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा पंढरपूरला एसटी महामंडळाच्या बसने जाणाऱ्या वारकर्यांना एसटी बसची कमतरता भासणार नाही. गेल्या तीन-चार वर्षातील गाड्यांच्या तुलनेत यंदा एसटीकडून जादा गाड्या सोडण्यात आल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. स्वारगेट, शिवाजीनगर आगारातून मोठ्या प्रमाणात बस सोडण्यात येणार आहेत.
एसटीचे बुकींग केल्यास…
एकाच गावातील वारकऱ्यांनी समुहाने एसटीचे बुकींग केल्यास त्यांच्या गावातून गाडी सोडण्याची व्यवस्था एसटी प्रशासनाने केली आहे. ४० जणांच्या समुहाने एकत्र बुकींग केल्यास त्यांच्या गावात जाऊन एसटी प्रवाशांना पंढरपूर येथे सोडेल. त्यानंतर तेथून पुन्हा त्यांच्या गावी आणून सोडेल. यामुळे प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधी एसटीने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी प्रशासने केले आहे.





