Pune Crime – नाशिकमधील अशोक खरात, तसेच पुण्यातील ऋषीकेश वैद्य प्रकरण ताजे असतानाच एका भोंदूने दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करुन एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आले. कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचे आमिष दाखवून भोंदूने महिलेवर बलात्कार केला. तसेच महिलेची ५० लाखांची फसवणूक केली. स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी ओैंदुबर मनोहर गडदे ( ४३, रा. तरटगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ४२ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित महिलेचे पतीशी पटत नव्हते. त्यांच्यात कौटुंबिक वाद झाल्याने ती वेगळी राहत होते. महिलेची पाच वर्षांपूर्वी एकामार्फत गडदे याच्याशी ओळख झाली. तेव्हा गडदे याने देवऋषी असून माझ्या अंगात दैवीशक्तीचा संचार आहे, अशी बतावणी केली. कौटुंबिक समस्या दूर करतो, असे सांगून त्याने महिलेला जाळ्यात ओढले. त्याने महिलेला स्वारगेट परिसरातील एका लाॅजवर बोलावून बलात्कार केला. तसेच महिलेला माणगाव परिसरात बोलावून तेथेही लाॅजवर बलात्कार केला. महिलेला नोकरी, तसेच बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून आरोपीने वेळोवेळी ५० लाख उकळले. काही रक्कम रोख स्वरुपात घेतली, तसेच महिलेकडून दागिने घेतले. गेले पाच ते सहा वर्ष हा प्रकार सुरू होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत. नाशिकच्या खरात प्रकरणानंतर दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करून पुण्यातील एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी ऋषीकेश श्रीकांत वैद्य (वय ३९, रा. वसई, जि. पालघर) याला अटक केली होती.