MS Dhoni Jersey : धोनीची ‘७’ नंबरची साथ सुटणार? IPL 2026 पूर्वी माहीच्या एका व्हिडिओने उडवली खळबळ; जर्सी नंबर का बदलणार?
MS Dhoni Jersey : आता मैदानातील सामन्यांपेक्षा सध्या एमएस धोनीच्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

MS Dhoni Jersey Number Seven Change IPL 2026 : आयपीएल २०२६ चे बिगुल वाजले असून २८ मार्चपासून क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होत आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याने स्पर्धेचे उद्घाटन होईल. मात्र, मैदानातील सामन्यांपेक्षा सध्या एमएस धोनीच्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या १८ वर्षांपासून धोनीची ओळख बनलेली ७ क्रमांकाची जर्सी आता बदलणार असल्याचे संकेत खुद्द धोनीनेच दिले आहेत.
“आता बदल करण्याची वेळ आली आहे!”
धोनीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, “७ क्रमांकाची आठवण नेहमी मनात कायम असेल, पण आता बदल करण्याची वेळ आली आहे.” या पोस्टमुळे धोनी आगामी हंगामात ७ ऐवजी ८ क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ७ जुलै रोजी जन्म झाल्यामुळे धोनीने आजवर ७ नंबरची जर्सी परिधान केली होती, जी आता जागतिक स्तरावर एक मोठा ब्रँड बनली आहे.
🚨Breaking🚨
MS Dhoni changed his jersey number 7 to 8!!! pic.twitter.com/DQbrWf8Drt
— 𝐒𝐭𝐚𝐫𝐜 ✦ 𝐅𝐨𝐫𝐜𝐞 (@ReelRavager) March 17, 2026
रवींद्र जडेजाचा नंबर धोनी घेणार?
MS Dhoni is going to wear No 8 jersey for tribute to ravindra jadeja ?
Or anything else ? pic.twitter.com/jgbSwrTkw8
— Kartik Sharma (@KartikSharmaFC) March 17, 2026
गेल्या हंगामापर्यंत रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता आणि तो ८ क्रमांकाची जर्सी परिधान करायचा. मात्र, यंदा जडेजा राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे. त्यामुळे जडेजाने रिक्त केलेला ८ नंबर आता धोनी आपली नवी ओळख बनवणार का? अशी चर्चा रंगली आहे. अनेक क्रीडा तज्ज्ञांच्या मते, हे एखाद्या ब्रँड प्रमोशनचा किंवा नव्या जाहिरातीचा भाग असू शकतो, मात्र धोनीने अद्याप याचे पूर्ण गुपित उघड केलेले नाही.
चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात धोनी ७ नंबरमध्येच दिसतो की ८ नंबरची नवी जर्सी परिधान करतो, याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे डोळे लागले आहेत.





