MPL NEWS : सोलापूर रॉयल्सने अखेर नोंदवला पहिला विजय

पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सोलापूर रॉयल्स संघाने पुणेरी बाप्पा संघाचा 3 गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदवला.
या स्पर्धेत सोलापूर रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून पुणेरी बाप्पा संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. पुणेरी बाप्पाच्या पवन शहा 2 धावांवर खेळत असताना सोलापूरच्या प्रथमेश गावडेने झेल बाद करून पुण्याच्या संघाला पहिला झटका दिला. त्यानंतर रोहन दामले व यश क्षीरसागर यांनी 15 चेंडूत 24 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
पण प्रथमेश गावडेने यश क्षीरसागरला झेल बाद करून वैयक्तिक दुसरा बळी टिपला व संघाला दुसरा धक्का दिला. हर्ष सांघवी(1धाव) चोरटी धाव घेत असताना सोलापूरच्या अवधूत दांडेकरने त्याला धावचीत बाद केले व त्यामुळे पुणेरी बाप्पा संघ 6 षटकात 3 बाद 34 धावा असा अडचणीत सापडला.
संयमी खेळी करणाऱ्या रोहन दामलेला (24 धावा) सोलापूरच्या प्रणय सिंगने पायचीत बाद करून आणखी एका विकेटची भर घातली. वैभव चौगुले(22धावा) व ऋतुराज गायकवाड(25धावा) पाठोपाठ बाद झाल्यामुळे पुण्याची अडचण आणखीन वाढली.
पुणेरी बाप्पा संघ 14 षटकात 7 बाद 87 अशा स्थितीत असताना सुरज शिंदेने 2 चौकार व 4 षटकाराच्या चौफेर फटकेबाजी करत 44 धावांची खेळी केली. सुरज व अजय बोरुडे (नाबाद 11) यांनी आठव्या गड्यासाठी 54 धावांची भागीदारी करून पुणेरी बाप्पा संघाला 20 षटकात 8 बाद 140 धावांचे आव्हान उभारून दिले.
140 धावांचे आव्हान सोलापूर रॉयल्स संघाने 19.1 षटकात 7 बाद 141 धावा करून पूर्ण केले. सोलापूरच्या यश नाहरला पुण्याच्या सचिन भोसलेने दुसऱ्याच चेंडूवर झेल बाद केले. त्यानंतर स्वप्निल फुलपगारने संयमी खेळी करत 52 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारासह 68 धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
स्वप्निलने अवधूत दांडेकर (20 धावा) च्या साथीत 27 चेंडूत 32 धावांची भागीदारी केली. अवधूत दांडेकरला शुभम कोठारीने यष्टिचीत बाद केले. पण स्वप्निलने एक बाजू सांभाळत विशांत मोरे (23 धावा) च्या साथीत तिसऱ्या गड्यासाठी 45 चेंडूत 50 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले.
शेवटच्या दोन षटकात सोलापूरला विजयासाठी 8 धावांची आवश्यकता असताना सचिन भोसलेने शेवटच्या चेंडूवर स्वप्निल फुलपगारला झेल बाद केले. त्यानंतर पुण्याच्या पियुष साळवीने पहिल्या व पाचव्या चेंडूवर अनुक्रमे मेहुल पटेल व विकी ओस्तवाल याना झेल बाद करून सामन्यात रंगत आणली. अखेरच्या षटकात 6 चेंडूत 3 धावांचे आव्हान सोलापूर रॉयल्स संघाने 19.1 षटकात 7 गड्यांच्या बदल्यात 141 धावा करून विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक
पुणेरी बाप्पा : 20 षटकात 8 बाद 140 धावा. (सुरज शिंदे 44, ऋतुराज गायकवाड 25, रोहन दामले 24, वैभव चौगुले 11, अजय बोरुडे नाबाद 11, सुनील यादव 3-32, प्रणय सिंग 2-29, प्रथमेश गावडे 2-31) पराभुत वि.
सोलापूर रॉयल्स : 19.1 षटकात 7 बाद 141 धावा. (स्वप्निल फुलपगार 68, विशांत मोरे 23, अवधूत दांडेकर 20, ऋषभ राठोड 13, सचिन भोसले 2-24, पियुष साळवी 2-33, रोहन दामले 1-18).





